भारतीय क्रीडा सेवेची सुरुवात व्हायला हवी-बेदी
By Admin | Updated: September 8, 2014 02:21 IST2014-09-08T02:21:50+5:302014-09-08T02:21:50+5:30
भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा याप्रमाणे भारतीय क्रीडा सेवा (इंडियन स्पोर्टस् सर्व्हिस : आयएसएस) असणे आवश्यक असून ....

भारतीय क्रीडा सेवेची सुरुवात व्हायला हवी-बेदी
नागपूर : भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा याप्रमाणे भारतीय क्रीडा सेवा (इंडियन स्पोर्टस् सर्व्हिस : आयएसएस) असणे आवश्यक असून त्यामुळे देशात खेळाला विकास होण्यास मदत मिळेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले. स्पोर्टस् जर्नालिस्टस् असोसिएशन आॅफ नागपूर(एसजेएएन) आणि रायसोनी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायसोनी समूहाचे सुनील रायसोनी, एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर व सचिव किशोर बागडे उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्यासाठी बेदी यांच्या हस्ते हिंगणा येथील नेहरू विद्यालय (सेंटर पॉर्इंट स्कूल चषक), कामठीचे एस.के. पोरवाल महाविद्यालय (के.सी. बजाज स्मृती चषक), क्रीडा संघटक मनीष गौर (मीरादेवी दस्तुरे चषक), बास्केटबॉलपटू मुग्धा अमरावतकर (बैद्यनाथ चषक), बॅडमिंटनपटू रोहन गुरबानी (जी.एच. रायसोनी चषक), धावपटू ज्योती चव्हाण (जी.एच. रायसोनी चषक) आणि क्रिकेटपटू फैज फझल (जी.एच. रायसोनी चषक) यांना गौरविण्यात आले.
भारतीय क्रीडा सेवेची संकल्पना मांडताना बेदी म्हणाले, ‘भारतीय क्रीडा क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी नवे धोरण आखण्याची गरज आहे. झपाट्याने बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा विचार करता, क्रीडा क्षेत्राचा कारभार सुरळीत चालावा यासाठी इंडियन स्पोर्टस् सर्व्हिसेस ही संकल्पना अमलात आणणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांची गरज आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांमध्ये प्रदीर्घ कालावधीपासून खुर्च्या अडवणाऱ्यांवर आपोआप बंधने येतील आणि भारतीय क्रीडा क्षेत्राचा जोमाने विकास होईल.’
बेदी पुढे म्हणाले, ‘जगात चिरकाल टिकणारे काहीच नसते. जे वर जाते ते खाली येणारच, हा प्रकृतीचा नियम आहे. वरची पातळी गाठल्यानंतर खाली येण्याचा कालावधी लांबविणारा महान खेळाडू ठरतो. खेळाडूंनी होणाऱ्या टीकेचा सकारात्मक विचार करावा. टीकेमुळे काय चुकले, याची कल्पना येते व सुधारणा करता येते.’कार्यक्रमाचे संचालन एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर व कोषाध्यक्ष सुहास नायसे यांनी केले तर सचिव किशोर बागडे यांनी आभार मानले. (क्रीडा प्रतिनिधी)