"भारताची प्रमुख शस्त्र निर्यातदार बनण्याकडे वेगाने वाटचाल, खासगी क्षेत्राचा...", राजनाथ सिंह यांचे विधान
By योगेश पांडे | Updated: January 18, 2026 21:06 IST2026-01-18T21:04:27+5:302026-01-18T21:06:43+5:30
दारूगोळ्याच्या पुरवठ्यात कमतरता जाणवत होती. केंद्र सरकारने धोरणांमध्ये बदल करून आणि प्रक्रिया सुलभ करून हे क्षेत्र खुले केले, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

"भारताची प्रमुख शस्त्र निर्यातदार बनण्याकडे वेगाने वाटचाल, खासगी क्षेत्राचा...", राजनाथ सिंह यांचे विधान
-योगेश पांडे, नागपूर
देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने पावले टाकत असताना संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राच्या सहभागाबाबत आव्हाने व शंका होत्या. मात्र संरक्षण उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाच्या बाबतीत खासगी क्षेत्र आता सार्वजनिक क्षेत्राच्या पुढे आहे. यामुळेच भारत एक प्रमुख शस्त्र निर्यातदार देश बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. रविवारी सोलर इंडस्ट्रीजमध्ये मध्यम क्षमतेच्या दारूगोळा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
संरक्षण उत्पादनांबाबत खासगी क्षेत्रात क्षमता आणि संभाव्यता होती. परंतु त्यांचा सहभाग कमी प्रमाणात होता. दारूगोळ्याच्या पुरवठ्यात कमतरता जाणवत होती. केंद्र सरकारने धोरणांमध्ये बदल करून आणि प्रक्रिया सुलभ करून हे क्षेत्र खुले केले. आता चांगल्या दर्जाचे उत्पादन वेळेवर पूर्ण होत आहे, तसेच उत्पादकता आणि वितरणात सुधारणा होत आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात खाजगी क्षेत्राचे योगदान उत्पादनाच्या किमान ५० टक्के असावे यावर भर देण्यात येत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
२०१४ मध्ये देशांतर्गत संरक्षण उत्पादन ४६,००० कोटी रुपये होते, ते आता १.५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. त्यात खाजगी क्षेत्राचे योगदान ३०,००० कोटी रुपये आहे, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी पिनाका क्षेपणास्त्रे तसेच 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापरलेल्या नागास्त्र ड्रोनसारख्या विविध संरक्षण उत्पादन क्षमतांसाठी सोलर समूहाचे कौतुक केले.
५० हजार कोटींच्या निर्यातीचे लक्ष
१० वर्षांपूर्वी संरक्षण उत्पादनांची निर्यात केवळ हजार कोटी रुपये होती, परंतु आता ती २५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. २०२९-३० पर्यंत ५०,००० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नवीन आयामांमुळे युद्धामध्ये गुंतागुंत वाढीस
युद्धे आता खूप गुंतागुंतीची झाली असून ती केवळ सीमांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ऊर्जा, व्यापार, शुल्क, पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि माहिती हे देखील युद्धाच्या नवीन आयामांचा भाग बनले आहेत. त्यामुळे युद्धांची तीव्रता वाढत आहे. युद्धाचे स्वरूप खूप वेगाने बदलत आहे. नवीन पद्धती समोर येत आहेत. त्याचे परिणाम थेट सामान्य जनतेला जाणवत आहेत, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.