भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह शक्य, मर्यादा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:10 IST2025-07-29T15:06:20+5:302025-07-29T15:10:55+5:30

एनटीसीएचे माजी सदस्य सचिव राजेश गोपाळ यांचा अभ्यास : मानव-वन्यजीव संघर्ष वाढला

India can sustain only 4,000 tigers, limit reached | भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह शक्य, मर्यादा संपली

India can sustain only 4,000 tigers, limit reached

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भारतात मागील दशकभरात वाघांची संख्या दुपटीने वाढली ही अभिमानाची व समाधानाचीही बाब आहे. मात्र, या वाढीला मर्यादा घालणे आता गरजेचे झाले आहे. व्याघ्रप्रेमी एनजीओंच्या मते ही गोष्ट नकारात्मक वाटत असली तरी देशातील वनक्षेत्राची मर्यादा लक्षात घेता भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह आता शक्य असल्याचे एक निरीक्षण आहे. वाघांची संख्या पाहता, ही मर्यादादेखील आता संपली आहे.


राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) चे माजी सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाळ यांनी 'सामाजिक वहनक्षमता व वाघ व्यवस्थापन' या संकल्पनेवर केलेल्या निरीक्षणातून हे वास्तव मांडले आहे. डॉ. गोपाळ यांच्या अभ्यासानुसार भारतात संरक्षित क्षेत्रे केवळ २ ते २.४ टक्के आहेत आणि यात जास्तीत जास्त ५ टक्के क्षेत्रापर्यंतच विस्तार होण्याची शक्यता आहे. या मर्यादित अधिवासात सर्वोत्तम परिस्थितीत जास्तीत जास्त ४,००० वाघांचा निर्वाह शक्य आहे. काही संघटना, संस्था या वाघांची संख्या १०,००० पर्यंत नेण्याची चर्चा करतात, पण डॉ. गोपाळ यांच्या मते, हे 'जमिनीवरच्या वास्तवापेक्षा फारच वेगळं' ठरेल. 


काय आहे 'सामाजिक वहनक्षमता'?
पर्यावरणीय दृष्टिकोनातून वहनक्षमता म्हणजे एखाद्या परिसंस्थेत किती वाघ राहू शकतात, हे ठरवणारे प्रमुख घटक म्हणजे अन्नसाखळी, नैसर्गिक अधिवास, पाण्याची उपलब्धता आदी; परंतु सामाजिक वहनक्षमता ही संकल्पना मानवी सहनशीलतेशी निगडित आहे. एखाद्या भागातील स्थानिक लोक संघर्ष न होता किती प्रमाणात वाघांचे अस्तित्व स्वीकारू शकतात? वाघांची संख्या जर अति झाली, तर ती लोकांना त्रासदायक वाटू लागते आणि संघर्षाची शक्यता वाढते. डॉ. गोपाळ यांच्या मते, जर आपण सामाजिक मर्यादेच्या पलीकडे वाघांची संख्या वाढवली, तर ते 'उत्पात करणारे प्राणी' म्हणून ओळखले जातील. सामाजिक वहनक्षमता लक्षात न घेतल्यास, ही यशोगाथा भविष्यात संघर्षकथांमध्ये रूपांतरित होऊ शकते.


जर सामाजिक मर्यादा ओलांडली, तर काय होईल?

  • मानव-वाघ संघर्ष वाढतो.
  • माणसांच्या दृष्टिकोनातून वाघ अडथळा ठरतो मग गावांमध्ये वाघ शिरले तर प्रतिकार सुरू होते.
  • प्रशासनाची अडचण वाढते. वाघ मारले जाऊ शकत नाहीत, त्यांचे स्थलांतरही करता येत नाही.
  • अनेक व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत अनेक पटीने पुढे गेली. त्यामुळे अधिवास ताब्यात ठेवण्यासाठी वाघांचे अंतर्गत संघर्ष वाढले.


महत्त्वाचे बिंदू देशात वाघांची संख्या - ३९८२

  • २०१४ ते २०२४ दरम्यान वाघांच्या हल्ल्यात ६६४ मानवी मृत्यू.
  • २०१४ ते २०२३ पर्यंत एकट्या महाराष्ट्रात ७०२१ पशुधनाचा मृत्यू
  • २०२२ साली मानवी मृत्यू ११० वर. त्यात महाराष्ट्रातील ७६ मानवी मृत्यू.
  • वाघांचे अस्तित्व सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तराखंड राज्यात एकवटले आहे.
  • देशात ५८ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. त्यातील काही प्रकल्पात वाघांची संख्या नगण्य आहे.


"देशात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रात विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मोजक्या राज्यात भरपूर व इतर राज्यात वाघच नाहीत. त्यामुळे वाघ मानव संघर्षसुद्धा शिगेला पोहोचला आहे. वाघांची संख्या वाढली ही आनंदाची बाब असली तरी वाढता संघर्ष आणि मानव मृत्यू ही चिंतेची बाब झाली आहे."
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी
 

Web Title: India can sustain only 4,000 tigers, limit reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.