धावत्या रेल्वेत मुलीसोबत अश्लील चाळे, प्रवाशांकडून आरोपीची धुलाई
By नरेश डोंगरे | Updated: March 17, 2024 00:46 IST2024-03-17T00:44:04+5:302024-03-17T00:46:41+5:30
श्रद्धा सेतू एक्सप्रेसमधील घटना : आरोपी चहा विक्रेता गजाआड

धावत्या रेल्वेत मुलीसोबत अश्लील चाळे, प्रवाशांकडून आरोपीची धुलाई
नागपूर : धावत्या रेल्वे गाडीत अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका आरोपीची संतप्त प्रवाशांनी बेदम धुलाई केली. आलोक परिहार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. तो चहा विक्रेता असून ही घटना नरखेड ते नागपूर दरम्यान घडली.
आलोक हा मूळचा उत्तर प्रदेशातील इटावाचा रहिवासी असून सध्या सदरमधील मोहननगरात राहतो. नातेवाईकाच्या मदतीने तो नागपुरात राहायला आला आणि रोजगार म्हणून तो रेल्वेत चहा विक्रीकरू लागला.
पीडित मुलगी नातेवाईकांसह शुक्रवारी रामेश्वरमला जात होते. श्रद्धा सेतू एक्सप्रेसच्या ए-१ कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. नरखेडजवळ पीडित मुलगी डब्यात आपले सामान ठेवत होती. दरम्यान, आलोक चहा विक्रीच्या निमित्ताने डब्यात आला आणि ती वाकून सामान ठेवत असताना आलोकने तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडितेने हा प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी आरडा-ओरड झाल्याने आरोपी तेथून पळून गेला आणि शौचालयात लपला. संतप्त प्रवाशांनी त्याला बाहेर खेचून त्याची बेदम धुलाई केली. दरम्यान, नागपूर आल्यानंतर या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी आलोकला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली. पुडील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, अनेक तास होऊनही रेल्वे पोलिसांनी अधिकृतपणे ही माहिती उघड केली नाही.