ओझोनचा वाढलेला स्तर, फटाके, थंडीमुळे दमा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 20:11 IST2022-10-21T20:09:31+5:302022-10-21T20:11:25+5:30

Nagpur News वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायुप्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत दमा (अस्थमा), सीओपीडी व अन्य फुप्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे.

Increased ozone levels, fireworks, cold weather will aggravate asthma | ओझोनचा वाढलेला स्तर, फटाके, थंडीमुळे दमा वाढणार

ओझोनचा वाढलेला स्तर, फटाके, थंडीमुळे दमा वाढणार

ठळक मुद्देकाळजी न घेतल्यास श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये होणार वाढ

नागपूर : कोविडनंतर प्रथमच दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायुप्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत दमा (अस्थमा), सीओपीडी व अन्य फुप्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे. या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही तर नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी भीती ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केली.

दिवाळीनिमित्त घरातील साफसफाईसह रंगरंगोटी, अगरबत्ती, मेणबत्ती व दिव्यांच्या धुरामुळे सर्दी-खोकला व दम्याचा रुग्णांना याचा त्रास होतो. दमा व श्वसनविकार असलेल्यांनी या दुर्लक्षित प्रदूषणाबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय वातावरणातील प्रदूषण हे सातत्याने वाढत आहे. कारखाने व इंडस्ट्रीज, मोठी मोठी बांधकाम यामुळे कणांचे प्रदूषण वाढते. फुप्फुसांच्या आरोग्यासाठी हे हानिकारक असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.

- फटाक्यांचा धुराचा सर्वाधिक त्रास

फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि अन्य विषारी वायू असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिज, ज्यांना कोविड होऊन गेलाय असे रुग्ण, कोविड फायब्रोसिसचे रुग्ण, अशा फुप्फुसाची व श्वसनाशी संबंधित रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे त्यांनी या धुरापासून दूर राहिले पाहिजे.

- ओझोन वायूचा वाढतो स्तर

सध्या वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. अधून-मधून ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे वातावरणात ओझोन वायूचा स्तर वाढतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून येतात. पयार्याने त्याचे रूपांतर सर्दी-खोकला-ताप यामध्ये होते.

- श्वसनासंबंधी आजाराकडे लक्ष द्या 

जेव्हा ऋतू बदलतो, तेव्हा शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. या दरम्यान श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दम्यासह व्हायरल फीवर, ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम पडतो. यामुळे वेळीच लक्ष देऊन काळजी घ्यावी.

- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ

Web Title: Increased ozone levels, fireworks, cold weather will aggravate asthma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.