नागपुरात बेफिकिरी वाढल्याने रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:05+5:302021-02-14T04:09:05+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट म्हणता येत नसली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला घेऊन बेफिकिरी वाढली आहे. यातच ...

नागपुरात बेफिकिरी वाढल्याने रुग्णांत वाढ
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट म्हणता येत नसली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला घेऊन बेफिकिरी वाढली आहे. यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्याने यात आणखी भर पडली. परिणामी, रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी तब्बल ६६ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या ५०० झाली. मागील पाच दिवसांत १७१७ बाधितांची भर पडली. जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधित चाचण्यांच्या तुलनेत ७.८३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने ४ फेब्रुवारीपर्यंतचा राज्यातील कोरोनाची स्थिती स्पष्ट केली. यात ‘पॉझिटिव्हीटी’च्या दरात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये नागपूर चौथ्या स्थानावर असल्याचे स्पष्ट करीत उपाययोजना करण्याचे सूचविले होते. याबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाने ८ फेब्रुवारी रोजी नागपूरला भेट देत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. कोरोना प्रतिबंधक कठोर उपाययोजना करण्याचे, चाचण्यांची संख्या वाढविण्याचे, उपचाराखाली असलेल्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे, होम आयसोलेशन रुग्णांवर पाळत ठेवण्याचे व कोरोना नियमवालींचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा सूचवित अधिकाऱ्यांचे कान पिळले होते. परंतु अद्यापही यावर काम सुरू झाले नसल्याचे चित्र आहे.
- कमी चाचण्यांची गंभीरताच नाही
कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना ‘ट्रेसिंग’करून त्यांची ‘टेस्टिंग’ केली जात होती. एका बाधित रुग्णांमागे साधारण ४ ते १२ संशयितांचे विलगीकरण करून त्यांची चाचणी व्हायची. परंतु ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होताच ‘ट्रेसिंग’कडे दुर्लक्ष झाले. परिणामी, ‘टेस्टिंग’ही कमी झाल्या. सध्या नागपुरात रोज तीन ते चार हजारादरम्यान चाचण्या होत आहेत. धक्कादायक म्हणजे, चाचण्या वाढताच रुग्णसंख्या वाढताना दिसून येत असतानाही याला फारसे गंभीरतेने कोणी घेत नसल्याचे दिसून येत आहे.
-‘होम आयसोलेशन’ नावालाच
लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना ‘होम आयसोलेशन’ मध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यांच्यावर प्रशासनाचे लक्ष नाही. केवळ दूरध्वनीद्वारे त्यांच्या संपर्कात राहून कागदोपत्री पूर्तता केली जाते. परिणामी, अनेक रुग्ण घराबाहेर पडत असल्यानेही संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत अशा एकाही रुग्णावर कारवाई झाली नाही. महापालिका मास्क न वापरणाऱ्यांवर रोज १५० ते २०० जणांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारत आहे. परंतु मास्क न वापरणाऱ्यांच्या संख्येत ही कारवाई फारच अल्प आहे.
- लसीकरणामुळे प्रतिबंधक उपाययोजना पडल्या मागे
नागपूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दैनंदिन दर हा ५० टक्क्यांच्या खाली आहे. बाधितांच्या सेवेत असताना लागण झाली नाही, आता काय होणार, या बेफिकरीमुळ आरोग्य कर्मचारी लसीकरण टाळत असल्याचे चित्र आहे. त्याचे प्रतिबिंब सामान्यांमध्ये पडत आहे. आज नाही, तर उद्या लस मिळणार असल्याने मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर सारख्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजना मागे पडत आहेत.
- कोरोनाची स्थिती
३१ डिसेंबरपर्यंत २०२०
एकूण रुग्ण -१२३७६७
एकूण मृत्यू - ३९३०
१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंतचे एकूण रुग्ण व मृत्यू
एकूण रुग्ण - १४०४७
एकूण मृत्यू - २८९
संक्रमणाचा दर
२०२० मध्ये - १३.२८ टक्के
१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत - ७.८३ टक्के