Increase in corona mortality in Nagpur as compared to the state | राज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ

राज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ

ठळक मुद्देराज्यात ३.४५ टक्के, नागपुरात ३.४७ टक्के ४१ ते ५० वयोगटात सर्वाधिक मृत्यू एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ तर आठ दिवसात १६८ रुग्णांचा गेला जीव

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. मृतांचे प्रमाण ३.४७ टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या तुलनेत ही किंचित वाढ असली तरी आरोग्य यंत्रणेने सामोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धक्कादायक म्हणजे, एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ मृत्यू झाले, तर मागील आठ दिवसात तब्बल १६८ रुग्णांचा जीव गेला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या जुने विक्रम मोडित काढत आहे. परिणामी, आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात संख्या केवळ १६ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९४१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. तर ऑगस्ट महिन्याच्या ८ तारखेपर्यंत ३,०१४ रुग्णांची भर पडल्याने, रुग्णांची संख्या ८,४०६ वर पोहचली आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात मृत्यूचा दर १.४४ टक्के होता, मे महिन्यात तो २.०३ टक्क्यावर गेला, जून महिन्यात तो पुन्हा खाली येऊन ०.९९ टक्क्यावर आला. जुलै महिन्यात यात वाढ होऊन १.७८ टक्के तर आता मृत्यूचा दर हा ३.४७ टक्क्यावर पोहचला आहे.

तरुण वयात मृत्यूचे प्रमाण अधिक
२८ जुलैपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार १ ते १० या वयोगटात १, २१ ते ३० वयोगटात ३, ३१ ते ४० वयोगटात ७, ४१ ते ५० वयोगटात २५, ५१ ते ६० वयोगटात २२, ६१ ते ७० वयोगटात २३, ७१ ते ८० वयोगटात १५ तर ८१ ते ९० वयोगटात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ४१ ते ५० वयोगटात झाले आहेत.

 

Web Title: Increase in corona mortality in Nagpur as compared to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.