फसवे परतफेड दावे रोखण्यासाठी आयकर विभागाचे छापे

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 15, 2025 20:27 IST2025-07-15T20:26:36+5:302025-07-15T20:27:54+5:30

गोंदियात कर फसवणुकीची प्रकरणे उजेडात : कर परतफेडीसाठी बनावट बिले

Income Tax Department raids to prevent fraudulent refund claims | फसवे परतफेड दावे रोखण्यासाठी आयकर विभागाचे छापे

Income Tax Department raids to prevent fraudulent refund claims

नागपूर : बनावट कर कपात दाव्यांवर देशभरात पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून, आयकर विभागाने सोमवारी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर विभागात गोंदिया येथे आयकर प्रॅक्टिस करणाऱ्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आणि काही ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत गोंदियामध्ये २०० कोटी रुपयांच्या कर फसवणुकीची प्रकरणे उजेडात आल्यानंतर या क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गोंदिया येथील कारवाईत आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भाग घेतला. भारतात ही मोहीम १५० हून अधिक ठिकाणी राबवण्यात आली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर तरतुदींचा व्यापक गैरवापर आणि बनावट कागदपत्रांद्वारे केलेले फसवे परतफेड दावे रोखण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर परतफेडीसाठी बनावट बिले वापरल्याचीही माहिती पुढे आली.

कर कपात श्रेणींचा गैरवापर
गोंदिया छाप्यात कर कपात श्रेणींचा मोठ्या प्रमाणात गैरवापर उघडकीस आला. यामध्ये घरभाडे भत्ता (एचआरए), राजकीय देणग्या, शैक्षणिक कर्जावरील व्याज, वैद्यकीय विमा कपात, गृहकर्जावरील व्याज, इलेक्ट्रिक वाहनांसाठी वजावट, धर्मदाय आणि संशोधन संस्थांना देणग्या, कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वजावट आदींचा समावेश आहे. फसवणूक करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परतफेड करण्यासाठी या श्रेणींअंतर्गत बनावट बिले आणि कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. पुण्यातील आयकर पथकाच्या नेतृत्वाखाली गोंदिया येथील प्रकरणात एक आर्थिक सल्लागार असल्याचे आढळून आले.

नागपूरमध्ये सीए आणि ट्रस्ट तपासाच्या टप्प्यात

सोमवारच्या नागपुरातील छाप्यांमध्ये निवासी आणि कार्यालयीन परिसरात धाडी टाकल्या. अनेक चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि एका ट्रस्टची चौकशी सुरू आहे. विभागाने फसव्या फाइलिंगशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. ही कारवाई ग्राउंड-लेव्हल इंटेलिजेंस आणि प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) साधनांचा वापर करून डेटा विश्लेषणावर आधारित होती. या साधनांनी संशयास्पद परतफेड पद्धती आणि अनियमित कपातीचे दावे शोधून काढले.

करदात्यांनी कोट्यवधी रुपयांच्या अयोग्य परतफेडीचा दावा करण्यासाठी आयकर कायद्यांतर्गत फायदेशीर तरतुदींचा गैरवापर केल्यास प्राथमिक निष्कर्षात दिसून आले. फसवणुकीची संपूर्ण व्याप्ती शोधण्यासाठी आयकर विभाग आता जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी करत आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Income Tax Department raids to prevent fraudulent refund claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.