वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे ऑगस्टमध्ये उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:07 IST2020-06-08T20:05:43+5:302020-06-08T20:07:07+5:30
सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गावर मेट्रो रेल्वेची वाहतूक सुरू आहे, हे विशेष.

वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे ऑगस्टमध्ये उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गावर मेट्रो रेल्वेची वाहतूक सुरू आहे, हे विशेष.
पूल अजनी चौक ते सोनेगाव पोलीस ठाण्यापर्यंत असून, एकूण लांबी ३.४ किमी, रुंद १९.६ मीटर आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी ४५० कोटींचा खर्च आला आहे. डबलडेकर पुलावर सर्वात वर मेट्रो रेल्वे, मध्ये उड्डाणपूल आणि खाली राष्ट्रीय महामार्ग आहे. पुलाचे बांधकाम जानेवारी २०१७ मध्ये सुरू झाले असून काम पूर्णत्वास येत आहे. जॉईंट, लाईट आणि मार्गाचे इतर काम मार्चपर्यंत तर मनीषनगर सब-वेचे काम आणि डबलडेकर पुलाचे काम मे ते जूनदरम्यान पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला होता. पण लॉकडाऊनमुळे कामाला विलंब झाला आहे.
मनीषनगर ‘आरयूबी’ ऑगस्टमध्ये
मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्याकरिता नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून यावे लागते. फाटक बंद झाल्यावर नागरिकांना बराच वेळ थांबावे लागते. या ठिकाणी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होती. महामेट्रोने हे काम हाती घेतले. लवकरच हा मार्गही पूर्ण होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. आरयूबी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूने ये-जा करता येणार आहे. वर्धा मार्गावरून डावीकडे आरयूबीमधून जाताना प्रारंभी खुल्या आरयूबीच्यावर फ्रेम लावण्याचे कार्य पूर्ण झाले असून, त्यावर पॉलिकार्बोनेट शीट लावण्यात आली आहे.
पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार
लॉकडाऊनच्या काळात या मार्गावरील बांधकाम बंद होते. या मार्गावर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम झाले आहे. विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक लवकरच सुरू होईल.
अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन), महामेट्रो.