युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 07:00 IST2022-02-27T07:00:00+5:302022-02-27T07:00:12+5:30

Nagpur News युक्रेनमधील प्रत्येकाला सध्या रशियाच्या रूपात काळ दिसतो आहे. या जीवघेण्या स्थितीत अपवादाने एकत्र आलेले वेगवेगळ्या देशांतील, राज्यांतील हजारो नागरिक एकमेकांचे मनोबल वाढवत आहेत. एकमेकांची काळजी घेत आहेत.

In Ukraine, the walls of country, foreign, religion and caste have collapsed | युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या

युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या

ठळक मुद्देजीवघेण्या भीतीमुळे स्थिती रडकुंडीचीअनोळखीच बनले एकमेकांचा आधार

नरेश डोंगरे

नागपूर - मृत्यू समोर दिसला की, आजूबाजूच्यांना ओळखीची गरज भासत नाही. तेथे कुण्या देशाचा, कुण्या जात, धर्म, वर्णाचाही प्रश्न नसतो. बेबस, बेसहारा असलेले हे सर्वच जण एकमेकांचा सहारा बनतात. युक्रेनमधील प्रत्येकाला सध्या रशियाच्या रूपात काळ दिसतो आहे. बॉम्ब हल्ले, रणगाडे, विमाने आणि हेलिकॉप्टरचा गडगडात प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. या जीवघेण्या स्थितीत अपवादाने एकत्र आलेले वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या राज्यांतील हजारो नागरिक एकमेकांचे मनोबल वाढवत आहेत. एकमेकांची काळजी घेत आहेत. अंगावर काटा उभा होईल, अशा स्थितीत अडकलेला नागपुरातील रशिल मिर्झापुरे या विद्यार्थ्याने लोकमत प्रतिनिधीसोबत शनिवारी सायंकाळी तेथील स्थितीचा लाइव्ह आढावा शेअर केला.

चांगले आणि कमी खर्चातील वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने विविध देशांतील लाखो विद्यार्थी युक्रेनच्या विविध महाविद्यालयांत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत, तर काही जण वेगवेगळ्या कारणांमुळे तेथे गेले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्याने ते तेथे अडकून पडले आहेत. रशिलही त्यापैकीच एक. तेथील स्थिती अनुभवत आहे.

तुलनेत बलाढ्य असलेल्या रशियाने युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी कुठलीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जानमालाची हानी होत आहे. कोणता बॉम्ब कुठून पडेल अन् कुणाचा जीव घेईल, कुणाला अपंगत्व येईल, याचा नेम नाही. डोळ्यांदेखत अनेकांचे जीव जात असल्याने आणि मन विषन्न करणारे अपंगत्व अनेकांच्या वाट्याला येत असल्याने सारेच जण शहारले आहेत. देहाच्या चिंधड्या कशा उडतात, ते जवळून बघितल्यामुळे आम्ही प्रचंड दहशतीत आहोत. सुरुवातीचे काही तास भूक तहान विसरलो होतो. आता मात्र पोटाची आगही आतून कमजोर बनवत आहे. त्यामुळे साऱ्यांचीच स्थिती एकसारखी आहे. प्रत्येक जीव आता हतबल असून, प्रचंड दहशतीत आहे. परिणामी कोण कोणत्या देशातला, राज्यातला, कोणत्या वर्णाचा, धर्माचा, हे सर्व मुळातून हद्दपार झाल्यासारखे झाले आहेत. प्रत्येकाला मायदेशी जाण्याची ओढ असल्याने सारेच सैरभैर आहेत. मात्र, या स्थितीत सर्वच जण एकमेकांना आधार देत आहेत. एकमेकांचे मनोबल वाढवून एकमेकांची काळजीही घेत आहेत. त्यामुळे आम्हा सर्वांनाच धीर मिळत असल्याचेही रशिल सांगतो आहे.

बंकर बनले आश्रयस्थान

आम्ही चार दिवसांपासून विनित्सिया शहरातील एका बंकरमध्ये जीव मुठीत घेऊन बसलो आहोत. बॉम्बचे हादरे बसतात. भीतीमुळे झोप कुणालाच नाही. विशिष्ट स्थितीत आम्हाला काही वेळेसाठी बाहेर काढले जाते. धोक्याचे संकेत मिळताच सायरन वाजतो अन् आम्ही पुन्हा बंकरमध्ये जाऊन दडतो. आज सायंकाळी ५ वाजता आम्हाला गुड न्यूज मिळाली. अन्य देशातील नागरिकांसह भारतातीलही अनेकांना मायदेशी पाठविण्यासाठी युक्रेनच्या विनित्सिया शहरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार आम्ही आता एका वाहनात बसून विमानतळाकडे रवाना होत असल्याचे रशिलने लोकमतला सांगितले.

Web Title: In Ukraine, the walls of country, foreign, religion and caste have collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.