लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणच्या समाजकंटकांनी गेल्या जून महिन्यातील १९ दिवसांत लोको पायलटला विविध ठिकाणी तब्बल १५० ट्रेन (मेल, एक्सप्रेस) रोखण्यास भाग पाडले. परिणामी अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक गडबडले आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आज या धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाला.
कुठे काही गडबड, गोंधळ झाला असेल, कोणता प्रवासी किंवा त्याचा नातेवाईक चुकून फलाटावरच राहून गेला असेल, किंमती चिजवस्तू खाली पडली असेल, समोर धोक्याचे संकेत असेल, प्रवाशाची प्रकृती बिघडली किंवा कोणता गुन्हा घडला आणि लगेच संबंधितांना मदत उपलब्ध करून देता यावी, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये 'चेन' (साखळी) लावली असते. ती ओढली की लोको पायलटला संकेत मिळतात आणि ते लगेच ईमर्जेन्सी ब्रेकचा वापर करून गाडी थांबवितात. मात्र, रेल्वेच्या मुळ उद्देशाला हरताळ फासण्याचे काम समाजकंटकांनी चालविले आहे. रेल्वेतून प्रवास करणारे गुन्हेगार, तस्कर, चोर भामटे, नशेडी आणि विनातिकिट प्रवास करणारे निर्जन ठिकाणी उतरून पळून जाण्यासाठी रेल्वेच्या डब्यात असलेली साखळी ओढतात. त्याला चेन पुलिंग म्हणतात. या चेन पुलिंगमुळे लगेच ट्रेन थांबते आणि गाडीतील आरपीएफचे जवान काय झाले त्याची शहानिशा करतात. सर्व काही आलबेल असल्याची खात्री झाल्यानंतर ते लोको पायलटला कळवितात आणि त्यानंतर पुन्हा गाडी पुढे निघते. मात्र, त्यात किमान १५ ते २० मिनिटांचा वेळ निघून गेलेला असतो. हा परिणाम एकाच गाडीवर होत नाही, तर त्या रूटवर धावणाऱ्या मागच्या चार ते पाच गाड्यांवर त्याचा परिणाम होत असतो. परिणामी या सर्व गाड्यांमधील प्रवाशांचे वेळापत्रक बिघडते आणि त्यांना नाहक नुकसान तसेच मनस्ताप सहन करावा लागतो.
रेल्वे प्रशासनात अस्वस्थतामध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या समाजकंटकांनी १ जून ते १९ जून या कालावधीत १५० रेल्वे गाड्यांमध्ये चेनपुलिंग केली. त्यामुळे या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा जबर फटका बसला. गेल्या वर्षी याच अवधीत ९८ गाड्यांना असा फटका बसला होता. यंदाची आकडेवारी त्यापेक्षा ५३ टक्के जास्त आहे. या गैरप्रकारामुळे रेल्वे प्रशासनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जनजागरण अभियान हेतूपुरस्सर चेन स्नॅचिंग करणाऱ्याला रेल्वे अधिनियमानुसार दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतुद आहे. मात्र, त्याला समाजकंटक जुमानत नाहीत. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने 'चेन पुलिंग' रोखण्यासाठी विशेष जनजागरण अभियान सुरू केले आहे. त्यानुसार आता रेल्वे स्थानकांवर या संबंधाने नियमित उद्घोषणा करतानाच पत्रक, स्टीकर छापून या प्रकाराला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.