पुरवणी परीक्षांचे निकालात नागपूर विभागात दहावीत ४३, बारावीत ४४ टक्के उत्तीर्ण
By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2025 17:55 IST2025-07-29T17:52:59+5:302025-07-29T17:55:08+5:30
पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर : मुलींपेक्षा मुलांचे यश अधिक

In the supplementary exam results, 43 percent pass in 10th and 44 percent pass in 12th in Nagpur division.
नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे जुन-जुैल काळात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. यात नागपूर विभागाने समाधानकारक कामगिरी केली आहे. विभागातून दहावीच्या ४३.६६ टक्के आणि बारावीतील ४४.७९ टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या उत्तीर्णांचा याचवर्षी अकरावी प्रवेशाचा मार्ग माेकळा झाला आहे. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींपेक्षा मुले व बारावीत मुलांपेक्षा मुलींना अधिक यश मिळविले आहे.
नागपूर विभागात दहावीच्या पुरवणी परीक्षेत नाेंदणी केलेल्या ४,७१५ पैकी ४,६२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २०१८ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये १२६४ मुले आणि ७५४ मुली उत्तीर्ण झाल्या. गडचिराेली जिल्ह्यातील एकमेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहे. ५ विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि ८९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. पुरवणी परीक्षेत गाेंदिया जिल्ह्यात सर्वाेत्तम (७८.०९) कामगिरी केली, तर नागपूर जिल्हा सर्वात खाली (२७.०१) राहिला.
बारावीच्या परीक्षेत नाेंदणी केलेल्या ८,२७३ पैकी ८,११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापाैकी ३,६३६ विद्यार्थी (४४.७९ टक्के) उत्तीर्ण झाले. यामध्ये परीक्षा देणाऱ्या २९७० मुलींपैकी १४२९ (४८.११ टक्के) मुली यशस्वी झाल्या, तर ५,१४७ मुलांपैकी २२०७ (४२.८७ टक्के) मुले यशस्वी ठरले. बारावीत पुरवणी परीक्षा देणारे १४५ विद्यार्थी गुणवत्तेत उत्तीर्ण झाले, तर ५११ प्रथम श्रेणी व ६२२ द्वितीय श्रेणीत पास झाले.
दहावीत गाेंदिया सर्वाेत्तम, नागपूर सर्वात खाली
जिल्हा परीक्षार्थी उत्तीर्ण झाले टक्के
गाेंदिया २१० १६४ ७८.०९
गडचिराेली ६९३ ३८१ ५४.९७
चंद्रपूर १०३९ ५४९ ५२.८३
भंडारा ६५१ ३०७ ४७.१५
वर्धा ६६७ २४९ ३७.३३
नागपूर १३६२ ३६८ २७.०१
बारावीत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाेत्तम
शाखा परीक्षार्थी उत्तीर्ण टक्के
विज्ञान २७४५ १९६३ ७१.५१
कला ३९५४ १२४८ ३१.५६
वाणिज्य १०२५ ३०८ ३०.०४
व्हाेकेशनल ३५८ १०१ २८.२१
अकरावी प्रवेशाचा मार्ग माेकळा
फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून जुन-जुलैच्या काळात पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्यामुळे दहावीतील २०१८ विद्यार्थी आता अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. नागपूर जिल्ह्यातील ३६८ विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत भर पडेल. दुसरीकडे बारावीचे ३६३६ विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतील.