-योगेश पांडे, नागपूरहोळीसाठी पैशांची मागणी करत एका व्यक्तीच्या मुली बाहेरच कशा निघतात हे पाहून घेण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वस्तीतील नागरिकांनी आरोपींना पकडून बेदम चोप दिला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नंदनवन झोपडपट्टीतील चेतन बुरडे, राकेश वानखेडे, अतुल शेंडे अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळ तक्रारदार कामावर जात असताना चेतनने त्यांना शिवीगाळ केली व एका पानठेल्यावर जायचे नाही अशी धमकी दिली.
घरात शिरला अन् धमकी दिली
तक्रारदाराने तो दारूच्या नशेत बोलला असेल असे समजून दुर्लक्ष केले. रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी तक्रारदाराच्या घरातच शिरले व शिवीगाळ करू लागले. होळीसाठी तू पाच हजार रुपये दिले नाहीत, तर तुझ्या मुली समाजात कशा वावरतात अशी धमकी दिली. या प्रकाराने तक्रारदाराचे कुटुंबीय हादरले.
लोक आले आणि आरोपींना चोप दिला
त्यांनी आरडाओरड केल्याने वस्तीतील लोक जमा झाले. आरोपींनी त्यांनादेखील शिवीगाळ केली. लोकांनी तीनही आरोपींना पकडून चांगलाच चोप दिला व पोलिसांना माहिती दिली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.