नाश्त्याच्या नादात रेंगाळली वंदे भारत एक्सप्रेस?; अनेकजण हैराण, अधिकाऱ्यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 21:03 IST2025-01-09T21:03:02+5:302025-01-09T21:03:42+5:30

दोन वर्षांपूर्वी नागपुरातून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून रोज दुपारी २.५ वाजता सुटते

In Nagpur Station Vande Bharat Express delayed due to breakfast?; Many are shocked, officials deny | नाश्त्याच्या नादात रेंगाळली वंदे भारत एक्सप्रेस?; अनेकजण हैराण, अधिकाऱ्यांचा नकार

नाश्त्याच्या नादात रेंगाळली वंदे भारत एक्सप्रेस?; अनेकजण हैराण, अधिकाऱ्यांचा नकार

नरेश डोंगरे 

नागपूर : नाश्त्याच्या नादात एखादा प्रवासी रेल्वे स्थानकावर रेंगाळला अन् त्याची गाडी सुटून गेल्याचे अनेकदा बघायला, ऐकायला मिळते. मात्र, नाश्ता गाडीत ठेवण्यासाठी एखादी ट्रेनच रेल्वे स्थानकावर रेंगाळल्याची अफलातून घटना आज नागपूर स्थानकावर घडली. विशेष म्हणजे, ही ट्रेन साधी सुधी नव्हे तर सध्या देशभराच्या प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस होय ! संबंधित सूत्रांनी दिलेल्या या माहितीचा मात्र ईन्कार करून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले.

देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेसची ओळख असून ही गाडी विलंबाने धावूच शकत नाही, असेही ऐकिवात आहे. प्रत्यक्षात मात्र विलंब सोडा अनेकदा ही गाडी रद्द झाल्याचेही वास्तव आहे. दोन वर्षांपूर्वी नागपुरातून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून रोज दुपारी २.५ वाजता सुटते. रस्त्यातील ६ थांबे घेत ती रात्री ७.२५ वाजता बिलासपूरला पोहचते. या आरामदायक गाडीत प्रवाशांना चहा-कॉफी, नाश्ता वगैरेची सुविधा मिळते. प्रवाशांच्या माहितीनुसार, या गाडीत प्रवाशांसाठी नाश्ता चढविण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे 'वेअर ईन माय ट्रेन' अॅप मध्ये या गाडीची सुटण्याची (डिपार्चर) टाईम २.११ वाजता दाखविण्यात आली आहे. संबंधित प्रवाशांच्या माहितीनुसार ही गाडी १० मिनिटे विलंबाने सुटली.

केवळ एकच मिनिटाचा विलंब
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मात्र ही गाडी केवळ १ मिनिट उशिराने सुटल्याचे सांगितले. नाश्ता चढविण्याच्या कारणाचा त्यांनी नकार केला. या संबंधाने आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: In Nagpur Station Vande Bharat Express delayed due to breakfast?; Many are shocked, officials deny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे