चार महिन्यात साडेचार लाखांवर प्रवाशांनी काढले ॲपवरून रेल्वे तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 22:29 IST2024-05-31T22:28:44+5:302024-05-31T22:29:01+5:30
‘यूटीएस’चा वापर वाढला : प्रवासी घरबसल्या काढत आहेत रेल्वेचे तिकीट

चार महिन्यात साडेचार लाखांवर प्रवाशांनी काढले ॲपवरून रेल्वे तिकीट
नरेश डोंगरे, नागपूर : मोबाईलच्या माध्यमातून स्मार्ट वर्ककडे वळणाऱ्या युवा पिढीसोबत आता रेल्वे प्रवासीही स्मार्ट वर्कला प्राधान्य देत आहेत. रेल्वे स्थानकावर जाऊन तिकिट काढण्यासाठी तेथील लांबच लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा प्रवासी आता ॲपच्या माध्यमातून तिकीट काढू लागले आहेत. गेल्या चार महिन्यात अशा प्रकारे साडेचार लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी ॲपचा वापर करून रेल्वेचे तिकिट काढलेले आहे.
वर्षाचा कोणताही महिना आणि कोणताही दिवस असो, रेल्वे तिकिट काउंटरसमोर तिकिट काढण्यासाठी प्रवाशांची लांबच लांब गर्दी बघायला मिळते. वेळेवर धावपळ नको म्हणून प्रवासाच्या कित्येक दिवसांपूर्वीच अनेक जण रेल्वेचे तिकिट काढून ठेवतात. त्यासाठी ते रेल्वे स्थानकावर येणे जाण्यासाठी होणारा गाडीच्या पेट्रोलचा खर्च सहन करतात. हे सर्व लक्षात घेऊन रेल्वेने अनारक्षित तिकिट प्रणाली (यूटीएस) विकसित केली. यामुळे मोबाईलच्या माध्यमातून ॲपवर जाऊन अनारक्षित तिकिट बुक करता येते. त्यासाठी रेल्वे स्थानकावर जाण्या-येण्याची अन् गर्दीत ताटकळत राहण्याची गरज राहत नाही. त्यामुळे या ॲपचा वापर करण्याला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे उघड झाले आहे.
जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून ठिकठिकाणच्या प्रवाशांनी यूटीएस ॲपद्वारे ४, ५७, १९७ तिकिटस् काढले. त्यातून मध्य रेल्वेला ९१,०५,९६५ रुपयांचा महसूल मिळालेला आहे.
ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये :
-प्रवासी पेपरलेस प्रवास तिकीट, सिझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट थेट मोबाईल ॲपद्वारे बुक करू शकतात. त्यामुळे ते हरवण्याची भिती राहत नाही.
-तिकीट तपासणी करणाऱ्यांना प्रवासी मोबाईल ॲपमधून तिकिट दाखवू शकतात. प्रवाशांना तिकीट बुक केल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून तिकीट तपशिलांसह बुकिंग आयडी प्राप्त होतो.
-प्रवासी यूटीएस ॲपद्वारे मासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकिटे खरेदी करू शकतात.