लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातून धावणाऱ्या विदर्भएक्स्प्रेससह तीन महत्त्वांच्या गाड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे. ईगतपुरी, हिरदगड आणि जांबारा ही तीन रेल्वे स्थानके आहेत. ३ सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.
गाडी क्रमांक १२१०५/ १२१०६ गोंदिया- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस आतापर्यंत नाशिक मुंबई मार्गावर असलेल्या ईगतपुरी स्थानकावर थांबत नव्हती. आता मात्र ही गाडी ईगतपुरी स्टेशनवर थांबणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक १२१०६ इगतपुरी येथे पहाटे ३:२५ वाजता पोहोचेल आणि पाच मिनिटांच्या थांब्यानंतर तेथून ३:३० वाजता पुढे निघेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२१०५ ईगतपुरी येथे रोज रात्री ९:३० वाजता येईल आणि तेथून ९:३५ वाजता प्रस्थान करेल.
दुसरी गाडी म्हणजे १२१३२ पुणे साईनगर शिर्डी ईगतपुरी स्थानकावर ४ सप्टेंबरपासून रोज मध्यरात्री १:४० वाजता पोहचेल आणि तेथे पाच मिनिटे थांबल्यानंतर तेथून पुढच्या प्रवासाला रवाना होईल. गाडी क्रमांक १२१३१ साईनगर शिर्डी पुणे हिची ईगतपुरी स्थानकावर आगमनाची वेळ ३ सप्टेंबरपासून रोज मध्यरात्री १२ वाजताची आणि प्रस्थानाची वेळ १२:०५ मिनिटांची राहील. याशिवाय गाडी क्रमांक १९३४३/१९३४४ इंदूर-नैनपूर पंचवेली एक्स्प्रेसला हिरदगड तसेच जांबारा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या तीनही स्थानकांवर वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा प्रायोगिक तत्त्वावर निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन थांब्यांमुळे प्रवाशांना आसपासच्या भागातील नागरिकांनादेखील लांब पल्ल्याचा प्रवास करणे सुलभ होणार आहे.