पाणीपुरवठ्यात तात्काळ सुधारणा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:16 IST2017-11-14T00:15:56+5:302017-11-14T00:16:22+5:30
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच विद्युत सुधारणांसाठी १२८.५५ कोटींचा विशेष विकास निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

पाणीपुरवठ्यात तात्काळ सुधारणा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच विद्युत सुधारणांसाठी १२८.५५ कोटींचा विशेष विकास निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून विकास कामे करताना पिण्याच्या पाणीपुरवठ्यात तात्काळ सुधारणा करा. दिलेल्या वेळेनुसार नियमित पुरविण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
हैदराबाद हाऊस येथे दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. महापालिका, नासुप्र, वीज वितरण कंपनी तसेच महसूल आदी विभागांना विशेष निधी तसेच जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर कामे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, सभापती अविनाश ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्याधिकारी आशा पठाण, शशांक दाभोळकर व नगरसेवक उपस्थित होते. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात महापालिकेतर्फे १२८.५५ कोटींची विकास कामे सुरू आहेत. मलवाहिका, पावसाळी नाली टाकणे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी आदी नागरी सुविधांची कामे येत्या वर्षभरात पूर्ण करा. जेथे पाणी उपलब्ध होत नाही अशा वस्त्यांची माहिती सादर करावी. यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुनी झालेली पाईपलाईन बदलण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. गरज भासल्यास आणखी १५ कोटी उपलब्ध करण्यात येईल. अमृत योजनेमधून नागरी सुविधा व पाणीपुरवठा उपलब्ध करा. गोरक्षण, राममंदिर तसेच रेणुकादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकी दोन कोटी तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले आहे. क वर्ग तीर्थक्षेत्र विकासांतर्गत मूलभूत सुविधांसाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सोनेगाव येथील ऐतिहासिक शिवमंदिर विकासाचा आराखडासुद्धा सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नासुप्रतर्फे १३८ विकास कामे सुरू आहेत. यातील ११२ पूर्ण झालेली आहेत. मंजूर अभिन्यासातील २० कोटींची ४८ कामे पूर्ण झालेली आहेत. या भागात १०० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. १३ कोटींची नवीन कामे सुचविण्यात आली आहेत.