आयआयआयटी नागपूरचा पाचवा पदवीदान समारंभ उद्या; ९४.६८ टक्के प्लेसमेंट
By आनंद डेकाटे | Updated: November 10, 2025 19:00 IST2025-11-10T18:58:52+5:302025-11-10T19:00:25+5:30
Nagpur : गत काही वर्षांत आयआयआयटीए नागपूरने उद्योग आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेने एम.एस. हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. लि. आणि ब्रह्माकुमारी संस्था यांच्यासोबत सामंजस्य करार केले आहेत.

IIIT Nagpur's fifth convocation ceremony tomorrow; 94.68 percent placement
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (आयआयआयटीएन) चा पाचवा पदवीदान समारंभ ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता व्हीएनआयटी नागपूरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांना पदव्या आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
डाॅ. पटेल यांनी सांगितले की, या समारंभाचे मुख्य अतिथी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम असतील, तर अध्यक्षस्थान आयआयआयटीएन च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे चेअरमन दीपक घैसास भूषवतील.
हा समारंभ संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. संस्थेचे प्लेसमेंट प्रदर्शन यंदाही उल्लेखनीय राहिले असून, एकूण २१४ कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आणि ९४.६८ टक्के प्लेसमेंट नोंदविण्यात आले.
गत काही वर्षांत आयआयआयटीए नागपूरने उद्योग आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेने एम.एस. हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. लि. आणि ब्रह्माकुमारी संस्था यांच्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. आतापर्यंत ९.२ कोटींचे संशोधन प्रकल्प आणि ३३.९५ लाखांचे सल्लागार प्रकल्प पूर्ण झाले आहेत. संस्थेच्या प्राध्यापकांनी २८ पेटंट्स आणि ४२७ संशोधन लेख प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला प्रभारी कुलसचिव कैलास एन. डाखळे, सहयोगी अधीष्ठाता डाॅ. तौसिफ दिवान आणि डाॅ. किर्ती दोरशेटवार उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी इन्स्टिट्यूट एक्सलन्स अवॉर्ड’ आणि ‘अवॉर्ड ऑफ मेरिटने सन्मानित होणार
यंदा एकूण ४३१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जातील. यात बी.टेक. (२०५ सीएसई आणि १२४ ईसीई), पीजी डिप्लोमा (६९), एम.टेक. (२५ आयसीटी) आणि पीएच.डी. (८ — सीएसई व ईसीई) यांचा समावेश आहे. यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना ‘इन्स्टिट्यूट एक्सलन्स अवॉर्ड’ आणि ‘अवॉर्ड ऑफ मेरिट’ ने सन्मानित केले जाईल.