झटपट नोकरी हवी असेल तर दहावी, बारावी नंतर करा आयटीआयला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:54 IST2025-05-28T13:53:49+5:302025-05-28T13:54:52+5:30
Nagpur : संगणकीय ट्रेडपासून एअरोनॉटिकल अभ्यासक्रमही उपलब्ध

If you want a job quickly, apply for ITI after 10th or 12th.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दहावी उत्तीर्ण केल्यानंतर आयटीआय हा पसंतीचा पर्याय आहे. आता तर कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढल्याने सर्व वर्गातील विद्यार्थी आयटीआयच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.
संगणकीय ट्रेडपासून एअरोनॉटिकल क्षेत्राचे अभ्यासक्रमही सुरू झाल्याने हा ओढा दरवर्षी वाढतो आहे. लवकर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधीमुळे आयटीआयकडे जाण्याचा कल वाढला आहे.
जिल्ह्यात १७ शासकीय आयटीआय, साडेतीन हजार जागा
नागपूर जिल्ह्यात १७ शासकीय आयटीआय आहेत, ज्यामध्ये एकूण ३६७६ जागा आहेत. शासकीय आयटीआयमध्ये एअरोनॉटिकलसह नव्याने अनेक अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे.
७३ अशासकीय आयटीआय, सहा हजारांवर जागा
जिल्ह्यात अशासकीय आयटीआयची संख्या ७३ असून, त्यात ६२५६ जागा उपलब्ध आहेत.
अंतिम गुणवत्ता यादी कधी ?
संचालनालयाच्या निर्देशानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन अर्ज कधीपर्यंत करता येणार ?
१३ मे रोजी दहावीचा निकाल लागल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २६ मे पर्यंत सुरू होती. यात ऑनलाईन अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, अर्ज शुल्क जमा करणे, तसेच व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय निवडण्याची प्रक्रियेचा समावेश आहे. ही मुदत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रवेशफेरी कधी सुरू होणार
अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर प्रवेश फेरी सुरू होईल. याबाबत संचालनालयातर्फे नव्याने वेळापत्रक जारी करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
"लवकरच नोकरीची किंवा व्यवसाय करण्याची संधी असल्याने आयटीआयचे अभ्यासक्रम आधीपासून विद्यार्थ्यांच्या पसंतीचा विषय आहे. कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांची मागणी वाढल्याने आता आयटीआयच्या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिकच वाढला आहे. अनेक नवीन अभ्यासक्रमांचा समावेश झाला आहे, जे रोजगारासाठी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा."
- विजय लाकडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी.