ही चूक कराल तर पडेल टक्कल ! बोरवेलच्या पाण्यामुळे केस गळतीचा वाढला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:50 IST2025-01-20T11:48:01+5:302025-01-20T11:50:07+5:30
Nagpur : ताणतणाव, आनुवंशिकता, आणि औषधांच्या दुष्परिणामामुळे केसगळती

If you make this mistake, you will go bald! Borewell water increases the risk of hair loss
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडे केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. पोषक आहाराचा अभाव, दीर्घकालीन ताणतणाव, आनुवंशिकता, संप्रेरकांमध्ये बदल किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यामुळे केस गळू शकतात. केस गळण्याचे आणखी एक कारण म्हणजे बोअरवेलचे पाणी. सध्या बहुतांश घरात बोअरवेलच्या पाण्याचा वापर होतो. या पाण्यामध्ये असणाया अतिरिक्त क्षारांचा परिणाम त्वचेवर व केसांवर होतो. पाण्यात सल्फेट जरी जास्त असले, तरी टक्कल पडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन त्वचारोग तज्ज्ञांनी केले आहे.
अंघोळीसाठी कुठले पाणी वापराल?
अंघोळीसाठी सर्वोत्तम पाणी म्हणजे कोमट पाणी; अति गरम पाण्यामुळे तुमचे केस कोरडे होऊ शकतात व केसगळती सुरू होऊ शकते.
पाण्यातील या घटकांमुळे केसगळती
काही भागात, नळाच्या पाण्यात क्लोरिन, क्लोरामाइन आणि कीटकनाशके यांसारखी विरघळलेली रसायने जास्त प्रमाणात असू शकतात. बोअरवेलच्या पाण्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा केसांना धोका पोहचू शकतो. शिसे, आर्सेनिक, लोह, क्रोमियम ६, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या जड धातूंनी पाणी दूषित होत असल्यास देखील केस आणि त्वचेच्या विविध समस्या उदभवू शकतात.
पाण्यातील सल्फेट केसांवर कसे परिणाम करते
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांनी सांगितले, पाण्यात जर सेल्फेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. सल्फेटस केसांमधून ओलावा काढून टाकू शकतो. ज्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, ठिसूळ होऊ शकतात, केसांना फाटे फुटू शकतात आणि निस्तेज होऊ शकतात. सल्फेटमुळे टाळू कोरडी होऊ शकते आणि खाज होऊ शकते. तसेच, सल्फेटसमुळे केसांचा रंग फिकट होऊ शकतो.
केसगळतीने डोक्याला ताप!
केसगळती सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना कोणती असेल, तर टक्कल पडणे. त्यातच केस गळतीवरील असंख्य उत्पादनांच्या जाहिरातीचा परिणाम मनावर होतो. एकूणच केसगळतीने डोक्याला ताप झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
टीडीएस किती हवा?
केसांसाठी पाण्यातील टीडीएस २०० पीपीएमच्या आत असायला हवे. टीडीएस ३०० पीपीएमपेक्षा जास्त आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, क्लोराइड व सल्फेटचे प्रमाण जास्त असते.
"बोअरवेलच्या पाण्यामधील खनिज घटकांमुळे पाणी हे जड होते. या जड पाण्याचा आपल्या टाळूवर खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये जास्त परिणाम होतो व केसगळतीस सुरुवात होते. त्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी व्यतिरिक्त पाण्याचादेखील आपल्या केसगळतीवर भयंकर परिणाम होतो. याकडे कानाडोळा करून चालणार नाही."
- डॉ. श्रद्धा महल्ले, त्वचारोग तज्ज्ञ