लक्ष्मीपूजनापर्यंत कचरा उचलला नाही तर महापालिकेत आणू, शहर काँग्रेसचा मनपा आयुक्तांना इशारा
By कमलेश वानखेडे | Published: November 9, 2023 03:44 PM2023-11-09T15:44:54+5:302023-11-09T15:45:27+5:30
निदर्शने करीत दीड तास घेराव
नागपूर : शहरातील कचरा गोळा करणारी कंपनी घरोघरी जावून कचरा संकलन करण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. फ्लॅट स्कीममधील कचरा उचलण्यासाठी नागरिकांना पैशाची मागणी केली जात आहे. हे प्रकार थांबले नाही व रविवारी लक्ष्मीपूजनापर्यंत शहरातील कचरा उचलल्या गेला नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते शहरातील कचरा गाड्यांमध्ये जमा करतील व महापालिकेच्या कार्यालसमोर आणून टाकतील, असा इशारा काँग्रेसतर्फे महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त डॉ. चौधरी यांच्या कक्षासमोर निदर्शने केली. कार्यकर्त्यांची गर्दी पाहून पोलिसांनी आयुक्तांच्या कक्षाचे दार बंद केले. पण त्यानंतरही सुमारे शंभरावर कार्यकर्ते आयुक्तांच्या कक्षात शिरले व तब्बल दीड तास घोषणाबाजी करीत आयुक्तांना घेराव घातला. यावेळी सोशल मिडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डु तिवारी, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, सुजाता कोंबाडे, लोणारे, राजेश कुंभलकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. विकास ठाकरे यांनी आयुक्त डॉ. चौधरी यांना सांगितले की, कचरा संकलन करणाऱ्या कंपनीकडून घरोघरचा कचरा उचलला जात नाही. शहरात काही ठिकाणी कचऱ्याचे डम्पिंग बनविले आहे. शहरात कचरा साठवून प्रदुषण करीत आहे. फ्लॅट स्कीम मधील कचरा उलण्यासाठी पैसे मागितले जातात. दिवाळीच्या तोंडावर हा कचरा उचलला गेला नाही तर कार्यकर्ते वस्तीतील कचरा गोळा करतील व महापालिकेत आणून जमा करतील, असा इशारा त्यांनी दिला. यावर आयुक्तांनी याची तत्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
खोदलेल्या नाल्या बुजवा
- आ. ठाकरे म्हणाले, अमृत योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या. त्या बुजविल्या नाहीत. त्यामुळे धुळ उडत आहे. मैदानात पाईप साठवून ठेवले आहेत. अधिकाऱ्यांनी याकडे डोळे बंद केले आहेत. याबाबीकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
प्रशासक राज सुरू, नागरिकांची लूट थांबवा
- आ. विकास ठाकरे म्हणाले, महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. झोन स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांवरर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. एनडीएसचे पथक दुकानदारांना धमकावून पैसे उकळत आहेत. ओसीडब्ल्यु अव्वाच्या सव्वा बील वसुल करीत आहे. नागरिकांनी उघडपणे सुरू असलेली लूट थांबविण्याची मागणी त्यांनी केली. महिनाभरात हे चित्र बदलले नाही तर महापालिकेच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला. यावर आयुक्त डॉ. चौधरी यांनी आपण स्वत: या बाबींकडे लक्ष देऊन महिनाभरात ही परिस्थीती सुधारू, असे आश्वासन दिले.