२१३ नाही तर आता ६४ अंगणवाड्या चकाकणार ! रंगरंगोटीचा १५ हजारांचा प्रस्ताव परत
By गणेश हुड | Updated: January 20, 2024 17:24 IST2024-01-20T17:24:33+5:302024-01-20T17:24:55+5:30
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २१३ अंगणवाड्यांची रंगरंगोटी केली जाणार होती.

२१३ नाही तर आता ६४ अंगणवाड्या चकाकणार ! रंगरंगोटीचा १५ हजारांचा प्रस्ताव परत
नागपूर : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २१३ अंगणवाड्यांची रंगरंगोटी केली जाणार होती. यासाठी एका अंगणवाडीसाठी १५ हजार रुपये प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु महागाईचा विचार करता या रकमेत रंगरंगोटी शक्य नसल्याने बांधकाम विभागाने हा निधी परत केला आहे.
एका अंगणवाडीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली असल्याने आता ६४ अंगणवाड्याच चकाकणार आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने दोन वर्षापूर्वी वित्त आयोगाच्या निधीतून २१३ अंगणवाड्यांच्या रंगरंगोटीसाठी ३२ लाखाचा निधी बांधकाम विभागाकडे वळता केला होता. यातून २१३ अंगणवाड्या चकाकणार होत्या. मात्र महागाईचा विचार करता या रकमेत रंगरंगोटी शक्य नसल्याने बांधकाम विभागाने हा निधी परत केला आहे. एका अंगणवाडीच्या रंगरंगोटीसाठी ५० हजार रुपये खर्च येणार असल्याने रंगोरंगोटीचा सुधारित प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविला जाणार आहे.