अवैध चिकन मटन मार्केट हटविले नाही तर आम्ही झोन ऑफिस मध्ये येऊन चिकन विक्री करू : मनसेचा इशारा
By योगेश पांडे | Updated: June 11, 2025 16:49 IST2025-06-11T16:47:37+5:302025-06-11T16:49:00+5:30
Nagpur : मनसेचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्तांना दिला इशारा

If illegal chicken mutton market is not removed, we will come to the zone office and sell chicken: MNS warns
नागपूर : वारंवार निवेदन देऊन विनंती करूनही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार नगर, जयप्रकाश नगर येथील नागरिकांच्या भावना कळत नसेल व अवैध चिकन मटन मार्केटच्या लोकांशी लक्ष्मी नगर झोन क्रमांक एकच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही लागेबांधे असतील तर आज पासून एक आठवड्याचा अल्टिमेटम देतो, जर अवैध मार्केट हटविले नाही तर या झोन ऑफिस मध्ये येऊन आम्ही चिकन विक्री करू असा निवेदनाद्वारे इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्त यांना दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून खामला सोनेगाव मार्गावरील जयप्रकाश नगर व सहकार नगर च्या प्रारंभी अवैध चिकन व मटन मार्केट मनपाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हे मार्केट फुटपाथवर असून या अवैध दुकानांसमोर बेवारस कुत्र्यांची फौज उभी असते , त्यामुळे परिसरात दुर्गंधी सोबतच सतत होणारे अपघात , काही वेळा भीषण अपघात होऊन लोकांना अपंगत्व आले , तरीही मनपा च्या लक्ष्मी नगर झोन ने या गंभीर विषयावर दुर्लक्ष केले.
आज मनसेच्या शिष्टमंडळाने पुरावे सादर करून सहाय्यक आयुक्त श्री चौधरी व निरीक्षक केळझरकर यांना निवेदन व विस्तृत माहिती दिली, त्यासोबतच हे चिकन व मटन विक्रेते कोण आहेत ? कुठल्या भागातील नागरिक आहेत ? याची माहिती मनपाकडे उपलब्ध आहे का ? असा सवालही केला.
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, नागपूर शहर उपाध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे यांचे सोबत महिला सेनानागपूर शहर अध्यक्षा सौ. रोशनी ताई खोब्रागडे, विभागअध्यक्षा सौ. प्रिया बोरकुटे, विभाग संघटक श्री चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष श्री रामोजी खोब्रागडे, श्री अजिंक्य मिश्रा, व्यापारी सेना विभाग संघटक श्री चेतन बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.