सुमेध वाघमारेनागपूर : माउंट एव्हरेस्ट, माउंट मकालु, माउंट मानसलू आणि माउंट ल्होत्से यांसारख्या बर्फाळ शिखरांवर तिरंगा फडकवून त्यांनी केवळ स्वतःची स्वप्नं पूर्ण केली नाहीत, तर महाराष्ट्र पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शिवाजी ननवरे यांचा जन्म एका सामान्य वारकरी कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण करून २००५ मध्ये ते पुणे पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाले. २०१३ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस उपनिरीक्षकपद मिळवले. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करताना त्यांच्या मनात पर्वतारोहणाची बीजे रोवली गेली. सन २०२० मध्ये त्यांनी लेह-लडाखमधील रकांग यात्से-३ (६२५० मी.) हे शिखर यशस्वीरीत्या सर केले. यानंतर त्यांनी मनालीतील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूटमध्ये पर्वतारोहणाचा 'अ' श्रेणीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
काही माणसं केवळ आपलं कर्तव्य पार पाडत नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही करतात. सोलापूर स्पर्श जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून घडलेला एक तरुण... पोलिस सेवेत कार्यरत राहतानाच त्याने अदम्य साहसाने हिमालयाच्या गगनाला भिडणाऱ्या शिखरांवर पाऊल ठेवले. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे यांची ही कहाणी केवळ एक पोलिस अधिकारी म्हणून केलेल्या कामगिरीपुरती मर्यादित नाही; ती आहे जिद्दीची आणि प्रेरणेची गाथा.
पोलिस आयुक्तांचा पाठिंबा
- या सर्व खडतर प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार होता. त्यांची नऊ वर्षांची मुलगी देवयानीने तर त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मी.) सर केले आहे.
- शिवाजी ननवरे यांच्या या प्रवासाला नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह राहुल माकणीकर, एसीपी अभिजित पाटील यांसारख्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.
- आज ३०० हून अधिक पुरस्कार आणि अनेक यशस्वी मोहिमांच्या जोरावर ननवरे 'तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा'कडे डोळे लावून आहेत.
८,००० मीटरवरील चार शिखरे : एक नवीन इतिहासशिवाजी ननवरे हे १७ मे २०२३ रोजी ३९ दिवसांच्या खडतर मोहिमेनंतर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८,८४८.८६मी.) सर करणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिले व्यक्ती ठरले. ३० मे २०२४ रोजी ५५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी माउंट मकालू (८,४८५ मी.) शिखरावर तिरंगा फडकावला. २४ सप्टेंबर २०२४ रोजी जगातील आठवे सर्वोच्च शिखर माउंट मानसलू (८, १६३ मी) त्यांनी सर केले. २३ मे २०२५ रोजी त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, जेव्हा त्यांनी एव्हरेस्टसारखीच आव्हाने असलेल्या माउंट ल्होत्से (८,५१६ मी.) शिखराला गवसणी घातली. ही सर्व शिखरे त्यांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांच्या टीममध्ये एकमेव भारतीय म्हणून सर केली.
"तुमची पार्श्वभूमी काहीही असो, जर तुमच्या मनात ध्येय असेल आणि त्याला गवसणी घालण्याची जिद्द असेल, तर तुम्ही कोणतेही शिखर गाठू शकता. जर कधी देवाला भेटलो, तर अभिमानाने सांगेन की, तू निर्माण केलेल्या या जगातील सर्वांत उंच शिखरावर मी पाऊल ठेवले आहे."- शिवाजी ननवरे, सहायक पोलिस निरीक्षक, नागपूर