तो प्लॉट माझा-काम न थांबवल्यास ठार मारेन, मालकाला धमकावले
By योगेश पांडे | Updated: February 16, 2024 16:19 IST2024-02-16T16:19:46+5:302024-02-16T16:19:58+5:30
एका आरोपीने तो प्लॉट त्याचा असल्याचा दावा देखील केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

तो प्लॉट माझा-काम न थांबवल्यास ठार मारेन, मालकाला धमकावले
नागपूर : वडिलांनी विकत घेतलेल्या प्लॉटवर बांधकाम करायला गेलेल्या मुलाला बाहेरील लोकांनी अडविले व ठार मारण्याची धमकी दिली. एका आरोपीने तो प्लॉट त्याचा असल्याचा दावा देखील केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मयुर माणिकराव गोल्हर (४३, देवळी, वर्धा) असे तक्रारदाराचे नाव असून तो एसटी महामंडळात सुरक्षा निरीक्षक आहेत. त्यांच्या वडिलांनी १९८८ साली मौजा बाबुळखेडा येथे चार हजार चौरस फुटाचा प्लॉट घेतला होता. तो प्लॉट त्यांनी २०१५ साली मयुर यांच्या नावावर करून दिला. दरम्यान २००९ साली आलुकाबाई उईके, दिलीप बरातीलाल जैस्वाल व राहुल गुलाबराव ढगे यांनी बनावट कागदपत्रे व बनावट कब्जापत्राद्वारे प्लॉटवर स्वत:चेदेखील नाव चढविले. ही बाब गोल्हर यांना लक्षात आली. गोल्हर यांनी त्या प्लॉटवर बांधकाम करण्याचे ठरविले व एका ठेकेदाराला काम दिले.
१ फेब्रुवारी रोजी ठेकेदार प्लॉटवर काम करत असताना दिलीप जैस्वालच्या माणसांनी येऊन काम थांबविले. ठेकेदाराने याची माहिती गोल्हर यांना दिली. त्यानंतर जैस्वालने गोल्हर यांना फोन करून प्लॉटवर बांधकाम कसे काय करत आहे अशी विचारणा केली. तो प्लॉट माझा असून जर काम थांबविले नाही तर ठार मारेन अशी त्याने धमकी दिली. ४ फेब्रुवारी प्लॉटवर काम सुरू असताना दिलीप जैस्वाल, केतन काळबांडे व अजय जैस्वाल हे तिघे तिथे आले. दिलीप व अजय जैस्वालने गोल्हर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर गोल्हर यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आलुकाबाई उईके, दिलीप जैस्वाल, राहुल ढगे व अजय जैस्वालविरोधात फसवणुकीचा व धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.