नागपूर : बेलतराेडी राेड, मनीषनगर येथे एका व्यक्तीच्या घरात अचानक रसेल व्हाईपर अर्थात घाेणस साप निघाल्याने घरातील लाेकांची तारांबळ उडाली. सर्पमित्रांनी माेठ्या शिताफीने या सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन करून जंगलात सोडले.
येथील निवासी चतुर वर्मा यांच्या घराशेजारील घरी हा साप निघाला. बाथरूमच्या मडक्यात लाकडांमध्ये हा दडी मारून बसला हाेता. घाेणसची ओळख नसल्याने या दाेन्ही महिला सापाला बाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत हाेत्या. यावेळी अंगणात दाेन महिला बसल्या हाेत्या व पाच वर्षाची मुलगी अंगणात खेळत हाेती. साप बाहेर निघून मुलीच्या पायाजवळही पाेहचला. सुदैवाने ती थाेडक्यात बचावली. यादरम्यान सर्पमित्रांना बाेलावण्यात आले. सर्पमित्र शुभम पराळे हे त्यांच्या सहकाऱ्यासाेबत पाेहचले व त्यांनी माेठ्या शिताफीने या विषारी सापाला पकडले. सापाच्या पाेटामध्ये पिल्ले हाेती. सर्पमित्रांनी वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दिले व नंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. यादरम्यान गाेटाळ पांजरी भागात बायपासजवळ सर्पमित्रांनी सहा फुटाची धामण सुरक्षित पकडली व वनविभागाच्या स्वाधीन केली.
वाटले साप, निघाली घाेरपड
बुधवारी मानेवाडा रिंग राेडवरील महाकालीनगर परिसरात दीपाली कुर्झेकर यांच्या घरी नाग सर्प असल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली. शुभम यांनी लागलीच घटनास्थळ गाठून पाहणी केली. मात्र ताे साप नसून घाेरपड असल्याचे लक्षात आले. घाेरपडीला पकडून नंतर जंगलात सोडले.