I do not support foreign investment, plastic ban! Nitin Gadkari | विदेशी गुंतवणूक, प्लास्टिक बंदी या गोष्टींचे मी समर्थन करत नाही! नितीन गडकरी

विदेशी गुंतवणूक, प्लास्टिक बंदी या गोष्टींचे मी समर्थन करत नाही! नितीन गडकरी

ठळक मुद्देएमएसएमईसाठी लवकरच वेबपोर्टल, पेमेंट ४५ दिवसाच्या आत मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात विदेशी गुंतवणूक व्हावी, या गोष्टींचे समर्थन करत नाही. मात्र, विरोध करण्याला काही कारणही नाही. देशातला पैसा देशातच गुंतवावा, उद्योग वाढावा, मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, देशाची गरज भागून उरलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे आणि त्यायोगे रोजगारात वाढ व्हावी. ही स्थिती लघू-सुक्ष्म-मध्यम उद्योगांमुळेच शक्य आहे आणि त्याअनुषंगाने लघु उद्योग भारतीने पुढाकार घ्यावा, त्यासाठी सरकार तत्पर असल्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
रेशिमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात लघु भारतीचे रौप्य महोत्सव वर्ष अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग : समग्र निती’ या विषयावरील चर्चासत्रात गडकरी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष जितेंद्र गुप्त, महामंत्री गोविंद लेले, ओमप्रकाश मित्तल, सुधिर दाते उपस्थित होते.
अलिबाबा, अ‍ॅमेझॉनसारख्या व्यावसायिक वेबपोर्टलमधून लघु उद्योगांमधील उत्पादनांना प्रचंड मागणी वाढत आहे. हिमालयात तयार झालेले मध तब्बल ७० हजार रुपये किलो दराने विकले जात आहे. मात्र, आपल्या रानावनात तयार झालेल्या चविष्ट आणि पौष्टिक मधाला शंभर रुपयेही मिळत नाही. हा मार्केटिंगचा दोष असून, हा दोष दूर करण्यासाठी भारत क्राफ्ट आणि जेमच्या सहयोगाने लवकरच एमएसएमई साठी वेबपोर्टल सादर होणार असून, या पोर्टलचे वार्षित उत्पन्न दहा लाख कोटी पर्यंत नेण्याचा माझे उद्दीष्ट असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. देशात अनेक गोष्टींच्या समस्या आहेत. मात्र, त्यावर बंदी हा उपाय नसून, पर्याय उपलब्ध करणे हा उपाय असतो. प्लास्टिकचा उपयोग मोठा आहे. मात्र, पर्यावरणामुळे प्लास्टिक बंदी कशासाठी? त्यापेक्षा पर्याय आणणे गरजेचे. म्हणून ब्राझिलवरून पर्यावरण उपयुक्त तंत्रज्ञान आणून नव्या तऱ्हेचे प्लास्टिक तयार केले जात आहे. त्यासाठी एमएसएमईने पुढाकार घ्यावा. त्याअनुषंगाने विविध लघु उद्योगांसाठी सरकारी अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या क्षेत्रातील उद्योगांचे पेमेंट ४५ दिवसाच्या आत मिळावे, हा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
सुदर्शनजींवर लोक हसायचे!
माजी सरसंघचालक सुदर्शन यांनी देशातल्या तेलबियांतून इंधन तयार होऊ शकते, असा विश्वास दिला. मात्र, त्यांच्यावर लोक हसायचे. असे शक्यच नाही, असे म्हणायचे. मात्र, मी त्यांच्याशी जुळलो आणि त्यांचे भाकित सत्यात उतरवले. लाखो लोकांना त्यापासून रोजगार मिळू शकतो, हे मी प्रात्याक्षिकातून सांगू शकतो. लघू उद्योगांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे आणि आधुनिकतेशी सांगड घालणे गरजेचे आहे. पाच कोटी लोकांना नवे रोजगार यातून निर्माण होतील, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
१६५ कोटी लोकांची गरज भागेल, एवढे उत्पादन करा - कृष्णगोपाल
देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. असे असतानाही आपल्या देशात आयात मोठ्या प्रमाणात होते. लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योगांतून ही तुट भरून काढायची आहे. त्यासाठी सरकारने निती धोरण योग्यतऱ्हेने अंमलात आणावे आणि या उद्योग क्षेत्रातून १६५ कोटी लोकांची गरज पूर्ण होईल, एवढे उत्पादन करण्यावर भर द्यावे. जेणेकरून भारतीयांची गरज पूर्ण होऊन निर्यातीला वाव मिळेल, असे आवाहन सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यावेळी म्हणाले.

Web Title: I do not support foreign investment, plastic ban! Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.