हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 20:01 IST2021-12-21T20:00:24+5:302021-12-21T20:01:00+5:30
Nagpur News मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे.

हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू
नागपूर : मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे.
मूळचे नागपूरचे असलेले भुते गेल्या चार महिन्यांपासून हैदराबाद येथे मुलाकडे राहायला गेले होते. त्यांच्या एका मित्राच्या मुलाचे लग्न असल्याने ते नागपुरात आले होते. हॉटेल प्राईडमागे एका गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले होते. रविवारी सकाळी ९च्या सुमारास ते आपल्या रूममध्ये गेले. सोमवारी सकाळी रूम स्वच्छ करण्यासाठी आलेल्याने त्यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना बोलवून घेण्यात आले. सोनेगावचे पीएसआय अनिल मांगलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता भुते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या नातेवाइकांना ही माहिती देण्यात आली. भुते यांची बहीण चैताली सुनील ठवकर (वय ४५, द्वारकापुरी, रामेश्वरी) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास होता. वेळेवर औषधे न घेतल्यामुळे भुते यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
-----