पत्नीच्या साडीने पतीने घेतला गळफास; सुसाईड नोटमधून समोर आलं कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 12:17 IST2022-04-25T12:08:51+5:302022-04-25T12:17:32+5:30

रविवारी सकाळी घरी कुणाचेही लक्ष नसताना पत्नीच्या साडीने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना दिली.

Husband commits suicide with wifes saree | पत्नीच्या साडीने पतीने घेतला गळफास; सुसाईड नोटमधून समोर आलं कारण

पत्नीच्या साडीने पतीने घेतला गळफास; सुसाईड नोटमधून समोर आलं कारण

ठळक मुद्देपत्नीच्या साडीने घेतला गळफास चिकणा येथील घटना

कुही (नागपूर) : लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माहेरी गेलेली पत्नी वारंवार विनंती करूनही नांदायला सासरी येत नसल्याने हताश पतीने तिच्या साडीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकणा येथे रविवारी (दि. २४) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

किसन अंकुश मोजनकर (रा. चिकणा, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव आहे. किसनचे ६ मार्च २०२२ रोजी लग्न झाले हाेते. लग्नानंतर काही दिवसातच त्याची पत्नी माहेरी गेली. तिने सासरी यावे म्हणून किसन व त्याच्या कुटुंबीयांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, ती आली नाही. त्यामुळे त्याने शनिवारी (दि. २३) पत्नीच्या आईवडिलांना बाेलावले हाेते. त्यावेळी किसनने त्याच्या पत्नीच्या वर्तनाबाबत तिच्या आईवडिलांना सांगत त्यात सुधारणा करण्याची विनंती केली हाेती. त्यावर तिच्या आईवडिलांनी तिला सासरी पाठविण्यास नकार दिला हाेता.

दरम्यान, किसनने हताश हाेऊन रविवारी सकाळी घरी कुणाचेही लक्ष नसताना पत्नीच्या साडीने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती

आत्महत्या करण्यापूर्वी किसनने सुसाईड नाेट साेडली हाेती. ती पाेलिसांना मिळाली. आई व ताई मी तुम्हाला सोडून चाललो आहे. माझ्या जाण्यामागे माझी पत्नी असून, तिचे दुसऱ्यासोबत संबंध असल्याने माझे आयुष्य बर्बाद झाले आहे. दुसऱ्यासोबत संबंध असताना तिने माझ्यासोबत लग्न करून माझे आयुष्य बर्बाद केल्याने मी आत्महत्या करीत आहे, असा उल्लेख त्यात असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Web Title: Husband commits suicide with wifes saree