Hungry wife poisoned in Nagpur | नागपुरात उपाशी पत्नीला पाजले विष

नागपुरात उपाशी पत्नीला पाजले विष

ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वीच भांडण : पती म्हणतो, तिने विष घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडणामुळे तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या पत्नीला दारुड्या पतीने विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार यशोधरानगरात घडला. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला असून त्याने पत्नीनेच विष घेतल्याचा दावा केला आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी पती देवेंद्र रामटेके (२७ वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्रचा २०१७ मध्ये पत्नी अश्विनीसोबत विवाह झाला होता. अश्विनीच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर तो तिला सतत पैशासाठी त्रास द्यायचा, छळही करायचा. एवढेच नाही तर शिव्या व धमकी देत असे. नेहमीप्रमाणे दारू पिऊन आल्यावर देवेंद्रने तिच्याशी वाद घातला व मारहाण केली. त्यामुळे ती प्रचंड तणावात होती. तीन दिवसांपासून तिने काहीच खाल्ले नव्हते. अशात देवेंद्रने मारहाण करून तिला विष पाजल्याची पत्नीची तक्रार आहे.
पोलिसात तक्रार करण्यासाठी ती यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहचली. मात्र तिथेच तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईकांनी मेयोमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान अश्विनीने देवेंद्रच्या कृत्याची माहिती पोलिसांना आणि नातेवाईकांना दिली. यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र देवेंद्रने आरोप फेटाळले असून पत्नीनेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Hungry wife poisoned in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.