‘ब्रँडेड वॉच’च्या नावाखाली बोगसगिरी, इतवारीतून शेकडो बनावट घड्याळे जप्त
By योगेश पांडे | Updated: June 11, 2023 19:39 IST2023-06-11T19:39:26+5:302023-06-11T19:39:43+5:30
‘ब्रँडेड वॉच’च्या नावाखाली बनावट घडाळ्यांची विक्री करणारे आणखी एक रॅकेट समोर आले आहे.

‘ब्रँडेड वॉच’च्या नावाखाली बोगसगिरी, इतवारीतून शेकडो बनावट घड्याळे जप्त
नागपूर : ‘ब्रँडेड वॉच’च्या नावाखाली बनावट घडाळ्यांची विक्री करणारे आणखी एक रॅकेट समोर आले आहे. इतवारीतील दोन दुकानांत छापा टाकून पोलिसांनी शेकडो बनावट घड्याळे जप्त केली आहेत. काही महिन्यांअगोदर त्याच परिसरात चार ते पाच दुकानांमध्ये कारवाई करण्यात आली होती. तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
इतवारी येथील सिटी पोस्ट ऑफिससमोरील मकवाने वॉच कंपनी तसेच टांगा स्टॅंड येथील अरोरा वॉच मटेरिअल हाऊस या दोन दुकानांमध्ये ब्रँडेड वॉचच्या नावाखाली बनावट घड्याळे विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दोन्ही दुकानांमध्ये छापे टाकले असता तेथे बनावट घडाळ्यांसह बेल्ट, डायलदेखील आढळले. मकवाने वॉच कंपनीचा मालक गौरव मकवाने (वय ३१, महाल) व अरोरा वॉच मटेरिअल हाऊसचा मालक प्रदीप अरोरा (न्यू नंदनवन ले आऊट) या दोघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मकवाने वॉच कंपनीतून टायटन कंपनीची बनावट घड्याळे, लेदर बेल्ट, डायल यांचे ५७४ नग जप्त करण्यात आले, तर अरोरा वॉचमधून १ हजार ९२ नग जप्त करण्यात आले. दोन्ही दुकानांतून ६ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील, विनायक कोल्हे, शशिकांत मुसळे, सदाशिव कणसे, अनंत नान्हे, शंभुसिंग किरार, पंकज निकम, प्रांजली तेलकुंटवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.