महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष पेटला; प्राण्यांच्या हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:17 IST2025-03-03T14:15:37+5:302025-03-03T14:17:02+5:30
६ वर्षांत ३३१ नागरिकांचा मृत्यू: जनावरांवर हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ

Human wildlife conflict ignites in Maharashtra; 11 civilians killed in animal attack
योगेंद्र शंभरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली असतानाच मानव आणि वन्यजीव संघर्षही वाढला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०२४-२५ मध्ये वाघ, बिबट आणि अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ६५४ ग्रामीण जखमी झाले तर ६१ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळच्या रामटेक, देवलापार, पारशिवनीसह अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात ११ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे वनविभागावर आता वन्यजिवांसोबतच नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षेचीही जबाबदारी आली आहे.
माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांनी काढलेल्या माहितीनुसार, केवळ सहा वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३,३६४ जण जखमी झाले. २०२४-२५ मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १२,४१० जनावरे जखमी झाली. तर, ४,६०९ बकऱ्या तसेच जनावरांचा मृत्यू झाला. विदर्भात वनक्षेत्रात संरक्षित जंगल असल्यामुळे वाघ, बिबट तसेच अन्य वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ते भक्ष्य शोधण्यासाठी कोर जंगलातून निघून बफर तसेच ग्रामीण क्षेत्रात शिरतात. त्यांना शेतात काम करणारे, जनावरे चारणारे आणि सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले ग्रामीण नागरिक दिसताच ते हल्ला करतात. शेत आणि गावात बांधून असलेल्या जनावरांची ते शिकार करतात.
जनजागृती आवश्यक
वन मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानुसार, वनक्षेत्राजवळ राहणाऱ्या ग्रामिणांना वन्यजीवांच्या आजूबाजूलाच राहावे लागते. अशात नागरिकांमध्ये जंगलात जाताना काय खबरदारी घ्यायची या विषयाच्या संबंधाने जनजागृती करणे आवश्यक आहे.
हल्ल्याचे वर्ष आणि नागरिकांची संख्या
वर्ष जख्मी मृत्यू
२०१९-२० ४२९ २७
२०२०-२१ ४०० ४३
२०२१-२२ २०४ २५
२०२२-२३ ३८५ ७८
२०२३-२४ १२९२ ९७
२०२४-२५ ६५४ ६१