धनत्रयोदशीला सोने खरेदीला झळाळी, सराफांकडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 10, 2023 19:40 IST2023-11-10T19:40:43+5:302023-11-10T19:40:57+5:30
सोने २०० रुपयांनी घसरून ६०,७०० रुपये

धनत्रयोदशीला सोने खरेदीला झळाळी, सराफांकडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
नागपूर: दिवाळीत धनत्रयोदशीला सोने खरेदीची प्रथा आहे. काही ग्राहक त्याआधीच खरेदी सुरू करतात. काही आधीच सोने बुक करून धनत्रयोदशीला घरी नेतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात वाढ झाली असतानाही शुक्रवारी मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केली. शुक्रवारी सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरून ६०,७०० आणि प्रतिकिलो चांदी १०० रुपयांनी कमी होऊन दरपातळी ७२,४०० रुपयांवर स्थिरावली. गेल्यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याचे दर ५१ हजार रुपये होते, हे विशेष
रविवारी लक्ष्मीपूजन आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार सोने-चांदीच्या दरात आता घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांची पाऊले सराफांच्या शोरूमकडे वळू लागली आहेत. अनेकांनी लग्नसराईचीही खरेदी सुरू केली आहे. आकडेवारीनुसार दोन दिवसांत शुद्ध २४ कॅरेट सोने ३०० रुपयांनी कमी झाले, मात्र चांदीत किलोमागे ७०० रुपयांची वाढ झाली. दिवाळीनंतर दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.
१३ वर्षांत सोने ४१ हजारांनी वाढले!
यंदा धनत्रयोदशीला ग्राहकांनी ६०,७०० रुपये दराने सोने खरेदी केले. १३ वर्षांआधी ३ नोव्हेंबर २०१० रोजी धनत्रयोदशीला दर १९,७०० रुपये, ९ नोव्हेंबर २०१५ रोजी २५,९०० रुपये, ६ नोव्हेंबर २०२० रोजी ५२,९०० रुपये, २ नोव्हेंबर २०२१ ला ४८,४०० आणि २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ५१,१०० रुपये भाव होते. सोन्यावर ३ टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे सोन्याचे भाव वाढतात.
सराफांकडे सोने खरेदीसाठी गर्दी ()
लोकांनी धनत्रयोदशीला सोन्याची उत्साहात खरेदी केली. शोरूममध्ये सकाळपासूनच गर्दी होती. दर ६० हजार रुपयांवर गेल्यानंतरही सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. ग्राहक गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी करीत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोने ९,६०० रुपयांनी वाढले.
राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.
धनत्रयोदशीला सोन्याचे दर :
वर्ष धनत्रयोदशी २४ कॅरेट
२०१० ३ नोव्हें. १९,७००
२०११ २४ ऑक्टो. २६,६००
२०१२ ११ नोव्हें. ३१,६००
२०१३ १ नोव्हें. २९,८००
२०१४ २१ ऑक्टो. २७,६००
२०१५ ९ नोव्हें. २५,९००
२०१६ २८ ऑक्टो. २९,९००
२०१७ १७ ऑक्टो. २९,८००
२०१८ ५ नोव्हें. ३०,९००
२०१९ २५ ऑक्टो. ३८,४००
२०२० ६ नोव्हें. ५२,९००
२०२१ २ नोव्हें. ४८,४००
२०२२ २२ ऑक्टो. ५१,१००
२०२३ १० नोव्हें. ६०,७००
(३ टक्के जीएसटी वेगळा)