योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात ही नागपूर महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, प्रशासनातील यंत्रणा मात्र मतदारांच्या अधिकारांमध्येच अडथळे आणण्याचे काम करीत आहे. उमेदवारांची शपथपत्रे विलंबाने संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. मात्र, आशीनगर झोनमधील शपथपत्रांना उमेदवारांच्या नावाचे 'फाईलनेम'च देण्यात आलेले नाही.
अनेक उमेदवारांची शपथपत्रे 'न्यू डॉक्युमेंट' अशाच फाइलनेमने अपलोड झाली आहेत. अशा स्थितीत आपल्या प्रभागातील उमेदवारांचे तपशील शोधणे मतदारांसमोरील मोठे आव्हानच झाले आहे. मागील काही काळापासून मतदार जागरूक झाले असून, ते उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व इतर माहिती तपासतात आणि त्यानंतरच मतदान कुणाला करायचे याचा निर्णय घेतात. अनेक उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असतात, तर काही उमेदवारांचे शिक्षण अगदी जेमतेम असते.
फारच एखादा उमेदवार सर्वसाधारण दिसत असतो, मात्र तो उच्चविद्याविभूषित असतो. ही सर्व माहिती उमेदवारांच्या शपथपत्रांतून मिळते. लोकसभा, विधानसभा इतकेच काय तर विधानपरिषदेच्या निवडणुकीतील सर्व शपथपत्रे तातडीने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर 'अपलोड' होतात. अगदी पुणे व इतर यासाठी महानगरपालिकांनीदेखील पुढाकार घेतला होता. मात्र, नागपूर महानगरपालिकेचा कारभार संथ होता. 'लोकमत'ने ही त्रुटी समोर आणल्यानंतर सोमवारी मध्यरात्री शपथपत्रे 'अपलोड' करण्यात आली. मात्र, त्यातदेखील अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे. उमेदवारांची शपथपत्रे प्रभागनिहाय अपलोड करण्यात आलेली नाही.
प्रत्येक झोननिहाय ही शपथपत्रे अपलोड झाल्याने सरमिसळ झाली आहे. त्यातही आशीनगर झोनमध्ये, तर ५१ उमेदवारांच्या शपथपत्रांना त्यांचे नाव देण्याऐवजी 'न्यू डॉक्ट्युमेंट' अशा पद्धतीने फाइल नेम देण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराचे तपशील तपासायचे असतील तर त्यासाठी अशा 'फाइल नेम'ची सर्व शपथपत्रे उघडावी लागत आहेत.
ना समान भाषा, ना समान मांडणी
दरम्यान, या भोंगळ कारभारात काही उमेदवारांची शपथपत्रेच अपलोड झालेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यात काही माजी नगरसेवकांचादेखील समावेश आहे. या प्रणालीत कुठेही एकसूत्रतादेखील नसून काही ठिकाणी मराठी, तर काही ठिकाणी इंग्रजीत नावे देण्यात आली आहेत. शिवाय फाईलनेम देण्यातदेखील समानता नसून एखाद्या उमेदवाराचे नाव शोधताना अडचणी येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची शपथपत्रेदेखील अपलोड करण्यात आली आहेत. त्यांची नावे 'रिजेक्ट'च्या लिंकमध्ये टाकणे आवश्यक होते.
Web Summary : Nagpur civic body's election transparency questioned. Candidate affidavits uploaded late, lack proper file names, hindering voter access. Information is disorganized, inconsistent, frustrating voters seeking candidate details. Some affidavits are missing.
Web Summary : नागपुर निकाय चुनाव में पारदर्शिता पर सवाल। उम्मीदवारों के हलफनामे देर से अपलोड, सही फाइल नाम नहीं, जिससे मतदाताओं को परेशानी। जानकारी अस्त-व्यस्त, असंगत, मतदाता उम्मीदवार विवरण खोजने में परेशान। कुछ हलफनामे गायब हैं।