Coronavirus; लाॅकडाऊनने कोंडीत सापडलेला शेतकरी जगेल कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 09:16 IST2021-06-02T09:10:53+5:302021-06-02T09:16:50+5:30
Coronavirus ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारी वर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दोन महिने लॉकडाऊन झाल्यानंतर जून महिन्यात काय पहायला मिळेल, याचा अद्यापही थांगपत्ता नाही.

Coronavirus; लाॅकडाऊनने कोंडीत सापडलेला शेतकरी जगेल कसा?
अमोल काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाने जग थांबले. लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. त्यामुळे येथील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारी वर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दोन महिने लॉकडाऊन झाल्यानंतर जून महिन्यात काय पहायला मिळेल, याचा अद्यापही थांगपत्ता नाही.
खरीप हंगामात बी-बियाणे आणि खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यातील मजूरवर्ग मिळेल तिथे काम शोधत आहे. इकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काटोल तालुक्याची लोकसंख्या ही दोन लाखांच्या जवळपास आहे. यातील ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. त्यामुळे कोरोनामुळे डबघाईला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कर्जासाठी भटकंती
गत हंगामातील बोनससुद्धा अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकित राहिले. पात्र, शेतकरी दिवस-रात्र एक करीत कर्जाकरिता सरसावले आहेत. हाती पैसा नसल्याने मिळेल तिथून पैशाची जमवाजमव सुरू आहे.
बी-बियाणे व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे शेतीमाल बेभाव विकावा लागला. हीच परिस्थिती आताही कायम आहे.
-बाबाराव काळे, शेतकरी, चिखली (मैना)
लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. वेळोवेळी बदलणाऱ्या निर्बंधांमुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. नवीन मालाची आवक थांबल्याने व ग्राहक संतुष्ट होत नसल्याने व्यापार बुडतो आहे.
गौरव ठाकरे, दुकानदार
गतवर्षी सततच्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. रबी हंगामात शेतकरी सावरत नाही तोच त्याला लॉकडाऊनच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. बाजार भाव हवा तसा मिळाला नाही.
- सुरेश कन्नाके
तालुका कृषी अधिकारी, काटोल