८० हजार कर्मचाऱ्यांची चाचणी चार दिवसात कशी होणार ? व्यापारी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 22:20 IST2020-08-14T22:19:15+5:302020-08-14T22:20:30+5:30
मनपाच्या कोरोना चाचणीच्या आदेशावर व्यापारी नाराज असून त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीचे आदेश देऊन संकटाच्या खाईत लोटले आहे. ही चाचणी व्यापाऱ्यांना बंधनकारक नकोच, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

८० हजार कर्मचाऱ्यांची चाचणी चार दिवसात कशी होणार ? व्यापारी संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या कोरोना चाचणीच्या आदेशावर व्यापारी नाराज असून त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीचे आदेश देऊन संकटाच्या खाईत लोटले आहे. ही चाचणी व्यापाऱ्यांना बंधनकारक नकोच, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
व्यापाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत चाचणी बंधनकारक केली आहे. काही व्यापारी आॅड-इव्हनमध्ये दुकाने बंद असताना चाचणीसाठी मनपाच्या चाचणी केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता गेले असता डॉक्टर हजर नव्हते. अशा स्थितीत नागपुरातील जवळपास ३० हजार दुकाने आणि कार्यरत ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांची चाचणी १८ ऑगस्टपर्यंत होणे शक्य नाही. एकाला १० मिनिटे यानुसार लाखावर लोकांची चाचणी करण्यासाठी महिना लागणार आहे. त्यामुळे मनपाने चाचणीची तारीख वाढवून द्यावी. दुसरीकडे मनपाचे अधिकारी तपासणीसाठी आल्यानंतर चाचणी प्रमाणपत्र नसल्यास पुन्हा दंडाचे हत्यार उगारतील. त्याचा त्रास व्यापाऱ्यांना होईल. व्यापाऱ्यांचे मत जाणून न घेता मनपा आयुक्तांनी घेतलेला एकतर्फी निर्णय व्यापाºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. मनपा केंद्रात चाचणी सहजरीत्या होत नसल्याने व्यापाऱ्यांना खासगी लॅबमध्ये जावे लागेल. याकरिता येणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे चाचणी बंधनकारक करू नये, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दुकानदारांना कोरोना चाचणी केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करायला थोडा उशीर झाला तर मनपाचे अधिकारी तब्बल ५ हजारांचा दंड ठोठावतात. त्याला विरोध केल्यास अधिकारी दुकाने बंद करण्याची धमकी देत आहेत. याशिवाय ऑड-इव्हनमुळे व्यापारी आधीच संकटात आहेत. उत्पन्न कमी झाले आहे. अशा स्थितीत दुकानदार स्वत: खर्च करून चाचणी करणे शक्य नाही.
मनपाने चाचणी अनिवार्य करू नये. व्यापारी स्वेच्छेने करीत असेल तर त्यावर बंधन असू नये. व्यापारी आर्थिक संकटात असताना त्यांना चाचणीचा खर्च झेपणारा नाही. त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना चाचणीचा कालावधी वाढवून द्यावा.
कैलास जोगानी, माजी अध्यक्ष नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स
आवश्यक वस्तू आणि फार्मसी २४ तास खुले ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतरही मनपाचे कर्मचारी दुकानदारांना सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करण्यास सांगतात. बंद न केल्यास दंड ठोठावतात. शिवाय कोरोना चाचणीचे तुघलकी आदेश मनपाने दुकानदारांवर थोपवू नयेत. लहान दुकानदारांना शांततेने व्यवसाय करू द्यावा.
ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव , नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघ
कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा आदेश मागे घेणे आवश्यक आहे. दुकानदार कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करून व्यवसाय करीत आहे. मास्क, सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करीत आहेत. व्यापारी आणि कर्मचारी कोरोना निगेटिव्ह असताना कुणी पॉझिटिव्ह ग्राहक दुकानात आला तर व्यापारी काहीही करू शकत नाही. व्यापारी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यवसाय करीत आहे.
विष्णू पचेरीवाला, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स
व्यापारी कोरोनाग्रस्त असल्यास दुकान दुसऱ्या दिवशी सुरू होणार
एखादा व्यापारी कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याचे दुकान पूर्णपणे सॅनिटाईज्ड करून त्याचे कुटुंबीय किंवा कर्मचारी दुकान दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो, असे आदेश मनपाने काढले आहेत. पूर्वीप्रमाणे आता दुकान सील होणार नाही वा परिसरही सील करण्यात येणार नाही.