कसे कमी होणार बालमृत्यू ?
By Admin | Updated: December 11, 2015 03:49 IST2015-12-11T03:49:12+5:302015-12-11T03:49:12+5:30
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यूची समस्या अजूनही कामय असून गेल्या ५ महिन्यांत ११० बालमृत्यू झाले आहेत.

कसे कमी होणार बालमृत्यू ?
मेळघाटातील वास्तव : राज्य शासनाचा पुढाकार अपेक्षित
योगेश पांडे नागपूर
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यूची समस्या अजूनही कामय असून गेल्या ५ महिन्यांत ११० बालमृत्यू झाले आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात २०१० सालापासून येथे २ हजारांहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. बालमृत्यू दराची सरासरी काढली असता हजारामागे ४२.१४ बालकांचा जीव गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेळघाटात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक केंद्रावर सरासरी २९ गावांचा भार आहे. अशास्थितीत बालमृत्यूचे प्रमाण कमी कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१० ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत मेळघाट भागात ० ते ६ वयोगटातील २,१२८ बालकांचा मृत्यू झाला. यात ० ते १ वर्षातील १४३० अर्भकांचा समावेश आहे. एकूण बालमृत्यूमध्ये अर्भकमृत्यूची टक्केवारी ६७.२० टक्के इतकी आहे. २०१० सालापासून झालेल्या बालमृत्यूंमध्ये अर्भकांचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. या ५ वर्षांची सरासरी काढली तर अर्भक मृत्यूदर दर हजारी ४२.१४ इतका आहे. केवळ २०१३-१४ मध्ये अर्भक मृत्यूदर हा दर हजारी ३७.८२ इतका होता. बाकीचे वर्ष हा दर ४० च्या वरच होता.