नागपूर : सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीपासून परतलेल्या पावसाने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. साेमवारी रात्रीपासून सर्व जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यास चांगलाच तडाखा दिला. येथे रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला. मंगळवारी सकाळपर्यंत तब्बल ११५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. पूर्व विदर्भात पूर्व व पश्चिमेकडे अकाेला वगळता सर्वत्र धाे-धाे सरी बरसल्या.
रात्री ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरले आहे. शहरात अनेक भागात पाणी साचले होते. पूरस्थितीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वरोरा-अर्जुनी मार्ग, गुंजाळा-कचराळा रस्ता, धानोरा ते भोयगाव मार्ग, चिचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे काटवन ते मूल (चिचोली मार्गे) मार्ग, असे अनेक मार्ग बंद झाले. भद्रावती तालुक्यात एका गावामध्ये पाणी शिरले. पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास २५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून माेठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे शेकडाे हेक्टरमधील पिकांचीही नासधुस झाली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात सकाळपर्यंत ८२.२ मि.मी. पाऊस झाला हाेता.
इरई धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाची तीन गेट एक मीटरने आणि चार गेट ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे इरई नदी काठावरील, तसेच चंद्रपूर शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे भंडारा (६८ मि.मी.) जिल्ह्यात मुसळधार, तर नागपूर (३०), गडचिराेली (१७) जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. गडचिराेली जिल्ह्यात अहेरी व नागपूर जिल्ह्यात पारशिवनी तालुक्यात मुसळधार सरी बरसल्या. पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यास दमदार सरी बरसल्या.
वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
वाशिम जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे पिकांच्या नुकसानात आणखीनच भर पडली आहे. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’सदृश स्थिती निर्माण झाली आहे. आठ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील वाशिम आणि कोंढाळा, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा आणि शिरपूर, तर मानोरा तालुक्यातील मानोरा, कुपटा आणि गिरोली या मंडळांचा समावेश आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६४.३ मिमी पावसाची नोंद मालेगाव तालुक्यात, तर सर्वात कमी ३.३ मिमी पावसाची नोंद कारंजा तालुक्यात झाली आहे. ओल कमी होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पुढचे तीन दिवस येलाे अलर्ट
साेमवार व मंगळवारी बहुतेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला हाेता. मंगळवारी वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात दमदार हजेरी लागली. इतर जिल्ह्यात पावसाचा जाेर कमी हाेता. यानंतरचे तीन दिवस म्हणजे ५ सप्टेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून हवामान विभागाने येलाे अलर्ट जारी केला आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी जाेरदार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.