कापूस किती दिवस घरी ठेवायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:10+5:302020-12-04T04:23:10+5:30
कळमेश्वर : शेतमालाला हमीभाव मिळावा याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी केली जाते. परंतु तालुक्यात १९ हजार ८९० क्विंटल कापूस ...

कापूस किती दिवस घरी ठेवायचा?
कळमेश्वर : शेतमालाला हमीभाव मिळावा याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी केली जाते. परंतु तालुक्यात १९ हजार ८९० क्विंटल कापूस खासगी खरेदी केंद्रावर विकला गेला. शासकीय केंद्रावर विक्रीसाठी ५९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तरीसुद्धा अद्यापपर्यंत शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी कापूस खरेदी केंद्रावर कमी दरात विकावा लागत आहे. यात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने कापसासाठी ५,५१५ ते ५,८२५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव ठरविला. परंतु प्रत्यक्षात कापसाला प्रतिक्विंटल ५,२०० ते ५,५५० पर्यंतच भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे सरासरी २५० ते ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सेलू, कोहळी, धापेवाडा येथील खासगी कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत १९ हजार ८९० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. परंतु अद्याप शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. काही वर्षापासून बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस विकणे बंद केले होते. परंतु यावर्षी पावसाने कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढलेला आहे. परंतु सद्यस्थितीत कापसाला खासगी खरेदी केंद्रावर शासनाच्या हमीभावापेक्षा जवळपास २५० ते ६०० रुपये प्रति क्विंटल कमी भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
----
यावर्षी कापसाच्या उत्पन्नात ४० ते ५० टक्के घट असल्याने भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापूस योग्य वेळी विकण्यासाठी आणावा.
- बाबाराव पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमेश्वर