कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत जाता कशाला!
By Admin | Updated: July 28, 2015 04:05 IST2015-07-28T04:05:32+5:302015-07-28T04:05:32+5:30
प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरसाठी विदर्भात उपचाराची सोय उपलब्ध आहे. नागपुरात तीन रुग्णालयांसह वर्धा, अकोला व

कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत जाता कशाला!
डॉ. मदन कापरे : विदर्भातच प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरवर उपचार शक्य
नागपूर : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरसाठी विदर्भात उपचाराची सोय उपलब्ध आहे. नागपुरात तीन रुग्णालयांसह वर्धा, अकोला व अमरावती रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा आहे. तज्ज्ञ डॉक्टर आहेत. गरीब रुग्णांसाठी विविध योजना आहेत, विशेष म्हणजे, येथे राहण्याची समस्या नाही, भाषेची समस्या नाही आणि थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो. असे असतानाही अनेक रुग्ण उपचारासाठी दिल्ली, मुंबईत जाऊन पैसा खर्च करतात, अशी खंत वरिष्ठ ईएनटी सर्जन व विदर्भ सोसायटी आॅफ हेड अॅण्ड नेक ओन्कोलॉजीचे अध्यक्ष डॉ. मदन कापरे यांनी येथे व्यक्त केली.
विदर्भ सोसायटी आॅफ हेड अॅण्ड नेक ओन्कोलॉजी व रोटरी क्लब आॅफ नागपूर साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वर्ल्ड हेड अॅण्ड नेक कॅन्सर डे’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव व सर्जिकल पॅथालॉजिस्ट डॉ. आर. रवी, कॅन्सर सर्जन डॉ. अभिषेक वैद्य व रोटरी क्लब आॅफ नागपूर साऊथचे अध्यक्ष अॅड. जयंत मोकादम उपस्थित होते.
२० टक्के युवक १२ व्या वर्गात जाण्यापूर्वीच तंबाखूच्या जाळ्यात अडकतात
डॉ. कापरे म्हणाले, दरवर्षी २.७४ लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण समोर येत आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे डोके आणि मानेच्या कॅन्सरचे प्रमाण गतीने वाढत आहे. लक्षणे दिसताच उपचार केल्यास उपचार संभव आहे. देशात ५७ टक्के पुरुष तर ११ टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. धक्कादायक म्हणजे, १२ व्या वर्गात जाण्यापूर्वी २० टक्के युवा तंबाखूच्या जाळ्यात अडकतात. अनेकांना या रोगाची माहिती असतानाही वेळीच त्याच्यावर उपचार करीत नाही. आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये या रोगावर उपचार नाही. या रोगाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
विदर्भात केमोथेरपीपासून रेडिएशनच्या सोयी
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून केमोथेरपी, रेडिएशनच्या सोयी तीन शासकीय रुग्णालयांसह दोन चॅरिटेबल केंद्र व अनेक खासगी केंद्रांवर उपलब्ध आहेत. विदर्भातील डॉक्टरांना आपले काम लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तिकडे १० रुग्ण पाहून त्याची चर्चा केली जाते, येथे १०० रुग्ण पाहूनही चर्चा होत नाही. चर्चा होणे आवश्यक आहे, असेही डॉ. कापरे म्हणाले.
तंबाखूवर प्रतिबंध लागावा
डॉ. अभिषेक वैद्य म्हणाले, राज्यात गुटख्यावर प्रतिबंध आहे, परंतु तंबाखूवर नाही. तंबाखू सहज उपलब्ध होत असल्याने याच्या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी कॅन्सरच्या रुग्णातही वाढ होत आहे. विशेषत: तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. तोंड न उघडणे, आवाजात बदल होणे, मानेवर सूज येणे, दात पडणे आदी लक्षणे डोके व मानेच्या कॅन्सरची आहेत. डॉ. आर. रवी म्हणाले, मानेवर सूज आलेली असेल, तोंडात अल्सर झाला असेल तर याची तपासणी होणे आवश्यक आहे. ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. म्युटेशनमुळे हा कॅन्सर असू शकतो.
यावेळी कार्यक्रमात डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. प्रणय टावरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन डॉ. रवी यांनी केले तर आभार अॅड. मोकादम यांनी मानले. (प्रतिनिधी)