कोणी कशी घेतली शपथ? लोढांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ; अनेकांकडून ‘जय श्रीराम’चा गजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:24 IST2024-12-16T08:23:49+5:302024-12-16T08:24:37+5:30
आपला नेता मंत्री म्हणून शपथ घेत असताना समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती.

कोणी कशी घेतली शपथ? लोढांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ; अनेकांकडून ‘जय श्रीराम’चा गजर
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राजभवनावर रविवारी ३३ मंत्री व ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून शपथ घेतली, तर बऱ्याच मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय श्रीराम’ चा गजर केला. आपला नेता मंत्री म्हणून शपथ घेत असताना समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती.
शिंदेसेनेचे संजय राठोड यांनी शपथ घेताना ‘जय जय सेवालाल’चा नारा दिला. जयकुमार रावल यांनी खानदेशी मातीला नमन करीत, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत ‘जय श्रीराम’चा गजर केला. पंकजा मुंडे या शपथ घेत असताना समर्थकांनी आली रे आली...महाराष्ट्राची वाघीण आली.., अशा घोषणा दिल्या. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे जय श्रीकृष्ण म्हणाल्या. शिवेंद्र राजे भोसले यांनी ‘जय शिवराय’ म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. शिंदेसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या स्मृतीला वंदन केले. नितेश राणे यांनी भगवा सदरा घालून शपथ घेतली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. भाजपच्या मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांनीही ‘जय श्रीराम’चा नारा दिला. राष्ट्रवादीचे मंत्री शपथ घेत असताना समर्थकांकडून अजित दादा, पक्का वादा.., अशी शब्दपूर्तीची घोषणा केली जात होती.