नागपुरातील वर्धमान नगरात हुक्का पार्लर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 21:30 IST2020-10-03T21:28:50+5:302020-10-03T21:30:36+5:30
Hookah Parlor raid, Nagpur crime news लकडगंज पोलिसांनी वर्धमान नगरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना ताब्यात घेतले.

नागपुरातील वर्धमान नगरात हुक्का पार्लर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज पोलिसांनी वर्धमान नगरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना ताब्यात घेतले. वर्धमान नगरातील सागर अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. त्याची माहिती कळताच शुक्रवारी रात्री लकडगंज पोलिसांनी तेथे छापा मारला. यावेळी तेथे काही तरुण धूर उडवताना दिसले. पोलिसांनी हुक्का पार्लरचा व्यवस्थापक राजेशकुमार दुबे तसेच संयम प्रदीप जैन, अक्षद विनोद जैन, हर्ष संदीप जैन, अर्चित राजेंद्र देशमुख, आयुष हरीश मेहता, मोहम्मद सुफियान, जाहिद नसीम अख्तर आणि अर्सलान हारुण अन्सारी यांना ताब्यात घेतले. कोरोना संक्रमणामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात ही मंडळी एकमेकांना खेटून हुक्क्याचा धूर उडवत बसली होती. पोलिसांनी त्यांना साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पीएसआय सुनील राऊत, हवालदार भोजराज बांते आणि शिपाई प्रदीप मंगेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
कोणताही परवाना नाही
विशेष म्हणजे, बिनबोभाटपणे चालविल्या जाणाऱ्या या हुक्का पार्लरच्या संचालकाकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. विनापरवाना हे हुक्का पार्लर चालविणारा आणि तेथे येणाऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या या आस्थापनाचा मालक पांडे नामक व्यक्ती असल्याचे समजते. तो देशपांडे ले-आऊटमध्ये राहतो. पोलिसांचा छापा पडताच तो फरार झाला. लकडगंज पोलिस त्याचा शोध घेत आहेत.