‘किंग आॅफ रोमान्स’ला स्वरमधूर श्रद्धांजली
By Admin | Updated: July 21, 2014 00:54 IST2014-07-21T00:54:37+5:302014-07-21T00:54:37+5:30
हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात त्याआधी कुणाच्याही वाट्याला न आलेले स्टारडम, ग्लॅमर, लोकप्रियता, यश ज्याला मिळाले त्या सुपरस्टारचे नाव होते राजेश खन्ना. सिनेमाच्या माध्यमातून त्या काळावर,

‘किंग आॅफ रोमान्स’ला स्वरमधूर श्रद्धांजली
नागपूर : हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात त्याआधी कुणाच्याही वाट्याला न आलेले स्टारडम, ग्लॅमर, लोकप्रियता, यश ज्याला मिळाले त्या सुपरस्टारचे नाव होते राजेश खन्ना. सिनेमाच्या माध्यमातून त्या काळावर, त्या काळातल्या तरुण पिढीवर अक्षरश: राज्य करणाऱ्या या सदाबहार नायकाला जाऊन आज दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने राजेश खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्री संती गणेशोत्सव मंडळ व खेलैय्या ग्रुपतर्फे व स्वरमधुरा प्रस्तुत ‘जिंदगी का सफर’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आज रविवारी वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले होते.
या सुरेल कार्यक्रमात गायक कलावंतांनी राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या गीतांचेसादरीकरण केले. मेरे सपनों की रानी, कब आयेगी तू... असं म्हणत प्रियाराधन करणाऱ्या राजेश खन्नांकडे बघून आपल्या स्वप्नामधला राजकुमार असाच असावा, असं त्या काळातल्या प्रत्येक तरुणीला वाटत असे. राजेश खन्नांसारखा गुरुशर्ट, त्यांच्यासारखी केसांची स्टाईल हे त्या काळातल्या तरुणांचं फॅशन स्टेटमेंट होतं. त्यांची ही सर्व खासियत या कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांमधून झळकत होती. राजेश खन्ना यांचा काळ संपला, त्यानंतरच्या काळात सिनेमे कमालीचे बदलले. परंतु राजेश खन्नांचा चाहता वर्ग कधीच बददला नाही. आजच्या कार्यक्रमातही त्याची प्रचिती आली. बाहेर पाऊस कोसळत असतानाही सभागृह खचाखच भरले होते. या माणसाने त्याच्या काळात काय गारुड केलं होतं, हेच दाखवत होते. दर्दी श्रोत्यांची ही गर्दी बघून गायकांनाही प्रेरणा मिळाली व राजेश दुरुगकर, शशी वैद्य, श्रद्धा जोशी व संजय चिंचोले यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. यात काही एकल तर काही युगल गीते होती. एक अनजान हसीना से..., कभी कभी इत्तेफाक से..., ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखे...इतना तो याद है मुझे के उनसे मुलाखत हुई...यासारख्या गाण्यातून गायकांनी राजेश खन्नातील अल्लड व रोमँटिक नायकाचे दर्शन घडवले तर हम थे जिनके सहारे...चिंगारी कोई भडके...या गाण्यांमधून राजेश खन्नांच्या आयुष्यातील विरहाच्या वेदनांचे दु:ख मांडले. प्रकाश खंडारे यांनी सेक्सोफोन, टिंकू निखारे यांनी बेस गिटार, प्रसन्न वानखेडे-ऱ्हिदम गिटार, महेंद्र ढोले-की बोर्ड, गोविंद गडीकर-की बोर्ड, रघुनंदन परसतवार-कोंगो/तुंबा, नितीन चिमोटे-ढोलक, अशोक टोकलवार-तबला, संजय बारापात्रे यांनी ड्रमवर साथसंगत केली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले.(प्रतिनिधी)