शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार
By Admin | Updated: March 15, 2015 02:20 IST2015-03-15T02:20:05+5:302015-03-15T02:20:05+5:30
देशासाठी लढणारे आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता आमच्या देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करीत असतात म्हणून देशवासीय सुरक्षित आयुष्य जगत असतात.

शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार
नागपूर : देशासाठी लढणारे आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता आमच्या देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करीत असतात म्हणून देशवासीय सुरक्षित आयुष्य जगत असतात. अशा जवानांना शत्रूशी लढताना वीरमरण येते. त्यानंतर त्यांचे कुटुंबीयही आपल्या माणसांपासून पारखे होतात. हे मरण देशासाठी गौरवास्पद असले तरी बलिदान केलेल्या सैनिकांचे कुटुंबीय आपल्या व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख पचवितात. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनीही देशासाठी खूप काही सोसले असते. अशाच एका वीरपत्नीचा भावपूर्ण सत्कार प्रहार संस्थेतर्फे करण्यात आला. वीरत्वाचा हुंकार असलेल्या या कार्यक्रमाला भावपूर्णतेची हळवी किनार होती. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार असल्याचे मत व्यक्त केले.
प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन सी. पी. अँड बेरार, रविनगरच्या प्रांगणात करण्यात आले. यंदाच्या गणराज्यदिनी अशोकचक्राचे मानकरी ठरलेले ५७ राष्ट्रीय रायफल्सचे नाईक नीरजकुमार सिंग यांना मरणोपरान्त हा सन्मान मिळाला.
दहशतवादी कारवायांचा सामना करताना दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या एक सैनिकाची सुटका केल्यावर त्यांना वीरमरण आले. या शहीद भारतवीराचा सन्मान करताना त्यांच्या वीरपत्नी परमेश्वरीदेवी यांचा सन्मान डॉ. गिरीश गांधी, दत्तात्रय शेकटकर आणि कर्नल सुनील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शेकटकर म्हणाले, सेनेत सहभागी होतानाच कुटुंब सोडावे लागेल आणि प्राणांचे बलिदानही वेळ आल्यास करावे लागेल, हे शिकविले जाते. जहाँ तुफाँ होता है वही हम कश्ती ले जाते है.
सैनिकांच्या कुटुंबातील लोकही महान असतात कारण त्यांनी त्यांचा माणूस देशासाठी दिला असतो. त्यामुळेच प्रहारचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. दहशतवादाचा आपण जवळून अभ्यास केला आहे. दहशतवादी कधीच जन्माला येत नाही माणसाला दहशतवादी केले जाते. हीनतेच्या भावनेतूनच लोक दहशतवादी होतात. केवळ सैन्यात सहभागी झाल्याने देशसेवा घडत नाही तर तुम्ही जे कराल ते देशासाठी करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
गिरीश गांधी यांनीही प्रहार संस्थेने गेल्या दोन दशकापासून केलेल्या कार्याचे अभिनंदन करून हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगितले.
या संस्थेमुळेच अनेकांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. नागपूर हे राष्ट्रीय विचारांचेच शहर आहे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी हीच भूमी निवडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाही येथेच झाली. येथे ताजुद्दीन बाबांचे सर्वाधिक भक्त हिंदूच आहे. साऱ्याच धर्माचे लोक येथे बंधूतेने राहतात. कटुता या शहराची वृत्ती नाही, असे ते म्हणाले. देशासाठी लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या नीरजकुमारसिंग यांच्या आत्म्याला शांतता लाभावी, अशी प्रार्थना करीत त्यांनी वीरपत्नी परमेश्वरीदेवी यांच्या पाठीशी हे शहर नेहमीच उभे आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रारंभी प्रहार मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिवाली देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली. विशाखा मंगदे यांनी वीररसाचे गीत सादर केले. संचालन व आभार असिधारा लांजेवार यांनी केले. (प्रतिनिधी)