नागपुरातील गुन्हेगारांची घरवापसी ठरली धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:54 IST2020-06-09T10:54:14+5:302020-06-09T10:54:43+5:30
कोरोनामुळे ज्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली किंवा होऊ शकते, अशा गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय झाला. त्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढवली आहे.

नागपुरातील गुन्हेगारांची घरवापसी ठरली धोकादायक!
: ठिकठिकाणी हैदोस
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या भीतीपोटी कारागृहातून जामिनावर सोडलेल्या गुंडांनी शहर वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. जागोजागी गंभीर गुन्हे करून हे गुंड कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवीत आहेत. या मोकाट गुंडांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार, बलात्कार, जबरी चोºया असे गंभीर गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली आहे.
गेल्या दोन वर्षात गुन्हेगारांना पद्धतशीर नियंत्रित करून शहरातील क्राईम रेट कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले होते. मात्र कोरोनामुळे ज्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली किंवा होऊ शकते, अशा गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ७२० गुन्हेगारांना कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. यातील जवळपास ५०० गुन्हेगार नागपुरातील आहेत.
मोठमोठे गुन्हे करून त्यांनी शहर वेठीस धरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात नागपुरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, हल्ले, लुटमारीचे आणि हाणामारीचे गुन्हे वाढले आहेत. त्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढवली आहे.
मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांपैकी एकाने कारागृहातून जामिनावर बाहेर पडल्यानंतर तिसºयाच दिवशी नागपुरातील पोलीस हवालदाराच्या पत्नीला शस्त्राचे घाव घालून ठार मारले.
कोरोनाचा लाभ मिळून नुकत्याच बाहेर आलेल्या आणि तब्बल १०५ गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या एका गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने अंबाझरीत एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या भावावर प्राणघातक हल्ला केला.
गेल्या आठवड्यात यशोधरानगरात ठार मारण्यात आलेला कुख्यात अनू ठाकूर नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. त्याने तिकडे दहशत पसरवणे सुरू केले होते.
हुडकेश्वर परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले आणि पोलिसांनी घातक शस्त्रांसह पकडलेले १० कुख्यात गुन्हेगार नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले आहेत.
विशेष मोहीम सुरू
कारागृहातून सशर्त जामिनावर गुन्हेगार बाहेर आले आहेत. बाहेर येताच त्यांनी गुन्हेगारी वर्तन सुरू करून शर्तींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अशा गुंडांना हुडकण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यांना लवकरच कारागृहात डांबले जाणार असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी सांगितले.