मध्य रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एचओजी सिस्टम कार्यान्वित
By नरेश डोंगरे | Updated: March 5, 2024 16:52 IST2024-03-05T16:52:15+5:302024-03-05T16:52:41+5:30
एचओजी ही अभिनव प्रणाली प्रवासादरम्यान गाडीला इलेक्ट्रिकचा पुरवठा करते. त्यामुळे एअर कंडिशनिंग, लाइटिंग आणि पंखे याच्या वापरासाठी आता डिझेल जनरेटरची गरज राहिली नाही.

मध्य रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एचओजी सिस्टम कार्यान्वित
नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विद्युत विभागाने कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्देशाने हेड ऑन जनरेशन सिस्टम (एचओजी सिस्टम) कार्यान्वित केली आहे. या सिस्टममुळे ट्रेन लाइटिंगसाठी डिझेल जनरेटर संच तसेच त्यावर होणारा डिझेलचा खर्च तसेच त्यामूळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात उल्लेखनीय यश मिळाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
एचओजी ही अभिनव प्रणाली प्रवासादरम्यान गाडीला इलेक्ट्रिकचा पुरवठा करते. त्यामुळे एअर कंडिशनिंग, लाइटिंग आणि पंखे याच्या वापरासाठी आता डिझेल जनरेटरची गरज राहिली नाही. शिवाय ७५० व्होल्ट थ्री-फेज वीज पुरवठा मिळत असल्याने नागपूर आणि अजनी कोचिंग डेपोमधील याच प्रणालीने देखभाल केली जात आहे. पूर्वी रेल्वे प्रशासन डिझेल जनरेटर संचावर अवलंबून असल्यामुळे ध्वनी प्रदुषण आणि कार्बन उत्सर्जनाने हवेत प्रदुषण होत होते
वर्षभरात हजार लिटर डिझेलची बचत
या प्रणालीच्या वापरामुळे चालू आर्थिक वर्षात एकट्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ९७६ लिटर डिझेलची बचत केली आहे. ज्यामुळे २६ लाख किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
अनेक सुपरफास्ट गाड्यात वापर
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस नागपूर-अमृतसर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस अजनी-पुणे एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि नागपूर- गरीब रथ एक्स्प्रेस या प्रवासी गाड्यांमध्ये या प्रणालीचा वापर केला जात आहे.