गोंदियातील उके गँगमधील दोन गुन्हेगारांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST2021-06-30T04:07:00+5:302021-06-30T04:07:00+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हद्दपारीचा आदेश कायम ठेवून, गोंदिया येथील कुख्यात उके गँगमधील गुन्हेगार राजकुमार भैय्यालाल ...

गोंदियातील उके गँगमधील दोन गुन्हेगारांना दणका
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हद्दपारीचा आदेश कायम ठेवून, गोंदिया येथील कुख्यात उके गँगमधील गुन्हेगार राजकुमार भैय्यालाल गारडे (५०) व महेश भीकूप्रसाद चक्रवती (२४) यांना जोरदार दणका दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नीलेश उमराव उके हा गँगप्रमुख आहे. ही गँग रेतीचोरी करून पर्यावरणाचे अतोनात नुकसान करीत असल्याचा आरोप आहे, तसेच या गँगने परिसरात दहशत माजवली आहे. गँगमधील गुन्हेगारांवर २०११ पासून ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी १४ जानेवारी, २०२१ रोजी आदेश जारी करून, या दोघांसह इतर गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून पाच महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. सुरुवातीला या दोघांनी सदर आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. ते अपील ३ मार्च, २०२१ रोजी खारीज करण्यात आले. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा नाकारला.