नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: June 17, 2024 10:51 IST2024-06-17T10:51:02+5:302024-06-17T10:51:39+5:30

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ हा अपघात झाला.

Hit and run back in Nagpur, eight people sleeping on the pavement were crushed by a drunk driver, two died | नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू

नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू

नागपूर : उपराजधानीत भरधाव कारचालकांचा बेदरकारपणाचे सत्र सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका वेगवान कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ हा अपघात झाला.

मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास फुटपाथवर काही लोक झोपले होते. हे लोक रस्त्यावर खेळणे विकून उदरनिर्वाह करणारे लोक होते व त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. कार तीन महिला, चार मुले व एका पुरुषाच्या अंगावरच गेली. यामुळे जोरदार आवाज झाला व एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. 

घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लगेच शोधमोहीम राबविली. कारचालक भूषण लांजेवार याला अटक करण्यात आली. तो दारूच्या नशेत कार चालवत होता. सद्यस्थितीत पाच जण गंभीर जखमी असून त्यांचा उपचार सुरू आहे, अशी माहिती वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिली.

Web Title: Hit and run back in Nagpur, eight people sleeping on the pavement were crushed by a drunk driver, two died