'बाबासाहेबका अपमान नही सहेगा हिंदुस्तान'; महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Updated: December 19, 2024 11:40 IST2024-12-19T11:39:36+5:302024-12-19T11:40:42+5:30
Nagpur : विधानभवन परिसरात गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध

'Hindustan will not tolerate insult to Babasaheb'; Mahavikas Aghadi MLAs' protest
मंगेश व्यवहारे
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सुरुवातीला संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर तेथून मविआचे आमदार सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विधानभवनात आले. ‘बाबासाहेबका अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’ अशा जोरदार घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसरात गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी सर्व आमदारांनी निळ्या टोप्या व दुपट्टे परिधान केले होते. ‘बाबासाहेब आंबेडकर... बाबासाहेब आंबेडकर...’ असा निरंतर जपदेखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला. ‘एकच साहेब, बाबासाहेब’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी, भाई जगताप, सचिन अहिर, डॉ. नितीन राऊत, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, रोहित पवार, गीता गायकवाड, भास्कर जाधव आदी आमदारांची उपस्थिती होती.
देशाची माफी मागावी
मला भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वारंवार मोदींचे नाव घेता. मग, तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळाला आहे का, असा सवाल काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी उपस्थित केला. ‘गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा नव्हे तर देशाचा, नागरिकांचा, संविधानाचा अपमान केला आहे. अमित शहा यांच्या बोलण्याची चौकशी व्हावी. तसे असल्यास त्यांनी देशाची माफी मागावी,’ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. भाजपासोबत असलेल्या दलित नेत्यांना बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल वाईट वाटत नाही का, असा सवाल उपस्थित करत चिराग पासवान, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, रामदास आठवले यांनी राजीनामा देत आमच्या आंदोलनात सहभागी व्हावी, असे देखील ते म्हणाले.
एकीकडे आंदोलन, दुसरीकडे फोटोसेशन
विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच आमदारांचे फोटोसेशन शेजारीच सुरू होते. त्यामुळे एकीकडे आंदोलन तर दुसरीकडे फोटोसेशन असे परस्परविरोधी चित्र यावेळी बघायला मिळाले. विरोधक जय भीमचे नारे देत असताना सत्ताधाऱ्यांनी कुठलीही नारेबाजी न करत शांततेत फोटोसेशन करून सभागृहाकडे वळले. तर फोटोसेशननंतर विरोधकांनी पुन्हा जोरदार आंदोलन केले.