उच्चशिक्षित दिव्यांग तरुणाचा जगण्यासाठी संघर्ष, समोसे विकून उदरनिर्वाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 18:34 IST2022-03-14T17:51:24+5:302022-03-14T18:34:37+5:30
उच्च शिक्षण घेऊनही सुरजला सामोसे विकण्यात कमीपणा वाटत नाही. सुरज यांचे आई वडील त्यांना या कामात सहकार्य करतात. कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज सुरजवर समोसे विकण्याची पाळी आली आहे.

उच्चशिक्षित दिव्यांग तरुणाचा जगण्यासाठी संघर्ष, समोसे विकून उदरनिर्वाह
सुरभी शिरपूरकर
नागपूर : समोसे पंधरा रुपये प्लेट.. नागपूरच्या काही भागात सकाळ पासूनच हा आवाज ऐकायला येतो... तीन चाकी दिव्यांग वाहनावर बसून एक व्यक्ती समोसे विकायला येतो आणि हे समोसे नागपूरकरांसाठी विशेष आहेत.
हे समोसे खास आहेत. कारण याला बनवून विकणारी व्यक्तीही तितकीच विशेष आहे. नागपुरात राहणारे सुरज करवाडे हे दिव्यांग आहेत. पण याच दिव्यांगावर मात करत ते उच्चशिक्षित झाले. त्यांनी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले परंतु नोकरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र अशा परिस्थित खचून न जाता, हार न मानता.. सुरज यांनी काहीतरी करण्याचा निर्धार केला. शरीराने पूर्णपणे साथ देत नसले तरीही मनानं खंबीर असलेल्या सुरजने समोसे विकण्यास सुरुवात केली. आज ते रस्त्यावर दिव्यांग वाहनाने फिरून समोसे विकतात.
उच्च शिक्षण घेऊनही सुरजला सामोसे विकण्यात कमीपणा वाटत नाही. सुरज यांचे आई वडील त्यांना या कामात सहकार्य करतात. कम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज सुरजवर समोसे विकण्याची पाळी आली आहे. त्यातही महागाईच्या काळात १५ रुपये प्लेट समोसे विकल्यावर खायचे काय आणि जपायचे काय, असा प्रश्न सुरजसमोर नेहमीच असतो. दिव्यांग असूनही जीवन जगण्याची त्यांची धडपड काही कमी झालेली नाही. काहीही झाले तरी मेहनत करून चार पैसे कमवायचे आणि स्वाभिमानाने जगायचे हा त्यांचा संकल्प अनेकांना लढण्यासाठीची प्रेरणा देणारा आहे.